Maharashtra CM: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकालानंतर मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू असताना आता मराठा क्रांती ठोक मोर्चाने ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असावे, अशी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे असं मत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी मांडलंय.
विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून महायुतीला मतदान केलं. त्यामुळे महायुतीचा राज्यभरात दणदणीत विजय झाला. राज्यात सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्यासाठी मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असायला हवेत, असं मराठा ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक म्हणाले.
मराठा महासंघाची देवेंद्र फडणवीसांचा नावाला पसंती
तर दुसरीकडे मराठा महासंघाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी पसंती देत पाठींबा दिला आहे. जरांगे पाटलांचं आंदोलन व्यक्ती द्वेशाचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कधी जातीभेद केला नाही आणि 2 टक्के लोक काय जातीभेद करणार? असा सवालही मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव संभाजी दहातोंडे यांनी केला आहे. मराठा महासंघाने यंदा 125 वर्ष पूर्ण केले आहे. आण्णासाहेब पाटील महामंडळ मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना केलं. तर प्रस्थापित मराठा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात असल्याचेही ते म्हणाले.
फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसच व्हावेत यासाठी अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह अष्टविनायक गणपती मंदिरावर देवेंद्र फडणवीस यांच्या वजना एवढा प्रसाद अर्पण करण्याचे नवस घेऊन साकडे घातले आहेत. राज्यभरातून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत, नवस, पूजा केली जात आहे. लवकरच मुख्यमंत्री पदाबाबतचं चित्र स्पष्ट होईल.
"आयोध्या वासियोंकी है पुकार एकनाथ शिंदेजी बने मुख्यमंत्री फिर एकबार"
मुख्यमंत्रीपदासाठी तिन्ही पक्षातून रस्सीखेच सुरू असताना आणि देवाकडे प्राथना केली जात असतानाच आता आपला लाडका नेता मुख्यमंत्री व्हावा असे बॅनर देखील आतात ठिक-ठिकाणी निदर्शनास येत आहेत. काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पून्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून यूपीच्या आयोध्येत बॅनरबाजी करण्यात आली आहे. "आयोध्या वासियोंकी है पुकार एकनाथ शिंदेजी बने मुख्यमंत्री फिर एकबार" अशा आशयाचे बॅनर आता अयोध्येत देखील लागल्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. मुख्यमंत्री पदावरून सध्या राज्यात भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे, तर जवळपास देवेंद्र फडणवीसांचं नाव स्पष्ट असल्याच्या चर्चा देखील आहेत. मात्र, लवकरच चित्र स्पष्ट होईल.
हे ही वाचा