Shiv Sena MLA Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत चाचपणी ठाकरे गटाने सुरू केली आहे. परंतु कायद्याच्या दृष्टीने राहुल नार्वेकर यांचा निकाल अवैध ठरवणे सर्वोच्च न्यायालयाला सहज शक्य होणार नाही, अस तज्ज्ञांचे मत आहे. 1992 साली कीहोतो खटल्यात अपात्र ठरलेल्या आमदारांना उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार असेल, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने केला होता. परंतु, न्यायालयात न्याय मागायला जाण्यासाठी आमदार किंवा खासदार अपात्र ठरायला हवेत. सध्याच्या प्रकरणात कोणीच अपात्र ठरलेले नाही, त्यामुळे न्यायालय नार्वेकर यांच्या निकालाचे न्यायालयीन पुनर्विलोकन (Judicial Review) घेऊ शकेल का, हा एक प्रश्न आहे. तरीही ११ मे २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातील निर्देश अध्यक्षांनी पाळले नाहीत, असा आक्षेप घेऊन न्यायालयात पुनर्विलोकन (Review) केले जाण्याची शक्यता शंभर टक्के फेटाळता येणार नाही.


आता व्हीप कसा लागू होणार?


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केले नसले तरीही भरत गोगावले यांनाच पक्ष प्रतोद म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे भरत गोगावले यांनाच व्हीप जारी करण्याचा अधिकार असेल व आता ठाकरे गटाच्या आमदारांना गोगावले यांचा व्हीप पाळणे बंधनकारक असेल. परंतु, भरत गोगावले यांना सभागृहातील कामकाजासाठीच व्हीप काढता येऊ शकतो. सभागृहाबाहेर एखादी राजकीय बैठक, कार्यक्रमासाठी काढलेला व्हीप पाळणे आमदारांना बंधनकारक नसते. 


ठाकरे गटाच्या आमदारांनी गोगवलेंचा व्हीप झुगारला तर..


ठाकरे गटातील आमदारांनी भरत गोगावले यांनी जारी केलेला व्हीप पाळला नाही तर ठाकरे गटातील आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते. पण त्यासाठी आधी गोगावलेंना व्हीप जारी करावा लागेल. ठाकरे गटाच्या आमदारांनी जर व्हीप पाळला नाही तर गोगावलेंना पुन्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे व्हीप न पाळणाऱ्या आमदारांना अपात्र करा, अशा याचिका दाखल कराव्या लागतील. राहुल नार्वेकर यांच्या निर्णायाबाबत अनेकांच्या मनात प्रश्न होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एबीपी माझाला Exclusive मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी विधिमंडळात भरत गोगावले यांचा व्हीप ठाकरेंच्या आमदारांनाही लागू होईल, असं सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी! भरत गोगावलेंचाच व्हीप ठाकरे गटाला लागू होणार, विधानसभा अध्यक्षांची माहिती