पिंपरी चिंचवड : गेली आठवडाभर कांद्याने चांगलाच भाव खाल्ल्याने तो जेवणातून हद्दपार झाला. त्यामुळं सर्वांनाच जेवणाचा पूर्ण आनंद लुटता आला नाही. पण शरद पवार यांच्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना आता हाच कांदा आनंददायी ठरला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाचं औचित्य साधत अवघ्या 80 पैसे प्रति किलो कांद्याची विक्री करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आकुर्डी येथील पदाधिकारी श्रीमंत जगतापांनी हा उपक्रम राबविला. कांदा खरेदी करण्यासाठी इथं महिलांची चांगलीच झुंबड उडाली.

कांद्याने प्रति किलो दोनशेचा आकडा गाठला होता, त्यामुळं देशातील जनता त्रस्त झाली होती. अशात काहींनी शेतकऱ्यांचं हित पाहून कांदा खरेदी केला पण अनेकांनी कांदा न खाणं हा पर्याय अवलंबला. न खाणाऱ्यांमध्ये पिंपरी चिंचवड शहरवासियांचा समावेश होता. पण त्यांना शरद पवारांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त हा कांदा अगदी स्वस्तात खाण्याचा योग आला. आकुर्डी राष्ट्रवादी काँग्रेसने अवघ्या ऐंशी पैशात प्रति किलो कांद्याची विक्री केली. या उपक्रमाला खासकरून महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. या संधीचा फायदा घेण्यासाठी चिमुकल्या बाळांना घेऊन ही महिला रांगेत उभ्या होत्या. इतक्या स्वस्तात कांदा मिळाल्याने या महिलांना सुखद धक्का बसला. प्रत्येक कुटुंबाला एक किलो असं तीनशे कुटुंबियांना हा लाभ घेता आला. निदान पुढील दोन दिवस तरी या सर्वांच्या जेवणात कांदा दिसेल हे नक्की. तत्पूर्वी ज्येष्ठांच्या हस्ते केक कापून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.



पवार यांचा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा 
दुसरीकडे आज मुंबईत शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, माझा जन्मदिवस माझ्या लक्षात रहात नाही परंतु माझ्या आईचा जन्मदिवस म्हणून लक्षात राहतो. माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवलं. 1936 साली लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचं शिक्षण व्हावं असा तिचा आग्रह होता याची माहितीही शरद पवार यांनी सभागृहात सांगितली.
शरद पवारांचा असाही एक कार्यकर्ता, 22 वर्षांपासून 310 किमीवरुन शुभेच्छा द्यायला येतात हे आजोबा

सार्वजनिक जीवनात यश मिळतं. संकट येतात. त्यावेळी दोन वर्ग माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे माझी आई आणि दुसरा माझा सर्वसामान्य माणूस आहे असेही शरद पवार म्हणाले. आज जो धनादेश दिला तो वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी दिला जाईल. शिवाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत 50 हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा केली जाईल. रक्कम वाढेल त्यावेळी त्याची व्याप्ती वाढवली जाईल असेही शरद पवार यांनी सांगितले. शेतकर्‍यांची मुलं सज्ञान व आत्मसन्माने उभी कशी राहील यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले.