Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) बॉक्स ऑफिसवरचा बादशाह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शाहरुख खान, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहमचा (John Abraham) 'पठाण' बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. आता या सिनेमाने एसएस राजामौलीच्या 'बाहुबली 2'ला (Baahubali 2) देखील मागे टाकलं आहे. 


'पठाण' बॉक्स ऑफिस कलेक्शन (Pathaan Box Office Collection)


शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आतापर्यंत जगभरात या सिनेमाने 1029 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर भारतात या सिनेमाने 529.44 कोटींची कमाई केली आहे. 'बाहुबली 2' या सिनेमाने 510.99 कोटींची कमाई केली होती. आता 'पठाण'ने 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड मोडत 529.44 कोटींची कमाई केली आहे. 






शाहरुखच्या 'पठाण'चा 'या' सिनेमांना फटका


'पठाण' हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. एकीकडे या सिनेमावर मोठ्या प्रमाणावर टीका होत असताना दुसरीकडे शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केल्यामुळे चाहत्यांमध्ये या सिनेमाची चांगलीच उत्सुकता होती. रिलीजआधी हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला असला तरी बॉक्स ऑफिसवर मात्र शाहरुखचाच बोलबाला दिसून आला. या सिनेमाचा कार्तिक आर्यनच्या 'शहजादा' आणि अक्षय कुमारच्या 'सेल्फी' या सिनेमांना चांगलाच फटका बसला. 'पठाण' पुढे कार्तिक आणि खिलाडी कुमार आपली जादू दाखवण्यात कमी पडले. 


'पठाण' या सिनेमाचं कथानक, कलाकारांच्या अभिनयासह सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 'झुमे जो पठाण' आणि 'बेशरम रंग' या गाण्यांतील दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या सिनेमात शाहरुखने रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. 'पठाण' सिनेमा रिलीज होऊन 38 दिवस पूर्ण झाले असले तरीदेखील जगभरात या सिनेमाची क्रेझ कायम आहे. 


शाहरुखचे आगामी प्रोजेक्ट (Shah Rukh Khan Upcoming Movie)


शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या सिनेमाचं शूटिंग करत असून दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तसेच शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. राजकुमार हिरानी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. 


संबंधित बातम्या


Pathaan : शाहरुखच्या 'पठाण'ने रचला इतिहास; महिनाभरातच केली 1000 कोटींची कमाई