चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील आदिवासी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. राजुरा येथील एका शाळेच्या हॉस्टेलमधील आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ राजुरामध्ये मूकमोर्चा तर लक्कडकोट येथे महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. या मोर्चामध्ये विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि आदिवासी समाजाने सहभाग घेतला. या प्रकरणी 6 मुलींनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. चंद्रपूरच्या राजुरा येथील संबंधित शाळेच्या हॉस्टेलमधील आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर जनमाणसांमधून रोष व्यक्त केला जात आहे. राजुरा शहरात 'त्या' शाळेच्या संस्थेचे कॉन्व्हेंट आणि हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमधील 2 चिमुकल्या मुलींची प्रकृती गंभीर झाल्यानं काही दिवसांपूर्वी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर या आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार  झाल्याचं समोर आलं. तसंच होस्टेलच्या इतर 6 मुलींनीही लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिल्यानं या प्रकरणाचं बिंग फुटलं.
या घटनेच्या निषेधार्थ आज राजुरात मूकमोर्चा तर, लक्कडकोट येथे महाराष्ट्र- तेलंगणा आंतरराष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला. अत्याचार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. या प्रकरणात 6 पीडित मुलींनी तक्रार दिली असून या आधारे पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत गुन्हा नोंदवून आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. यात हॉस्टेल अधीक्षक, उपअधीक्षक आणि 2 महिला गृहपालांचा समावेश आहे. दरम्यान या हॉस्टेलमधील याहून अधिक मुलींवर अत्याचार झाल्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी अधिक कसून तपास सुरु केला आहे.