सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तसंच केंद्रीय गृहमंत्रीपद आणि राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. 2019 ची लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय निवृत्ती घेणार असल्याचं सुशीलकुमार शिंदेंनी जाहीर केलं आहे. काल दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची मुदत संपण्यापूर्वी सुशीलकुमार शिंदेंनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या राजकीय संन्यासाचा मुहूर्त जाहीर केला आहे.


VIDEO | 2019 च्या लोकसभेनंतर राजकारणातून निवृत्ती : सुशीलकुमार शिंदे | सोलापूर | एबीपी माझा


2019 ची ही लोकसभा निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असेल, यानंतर मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान यावेळी सुशीलकुमार शिंदेंनी प्रकाश आंबेडकर आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांना तिलांजली दिल्याची टीका त्यांनी केली. भाजपकडे कोणाताही विकासाचा अजेंडा नाही. जातीय कारणांमुळे भाजपाने सिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी दिली, असा आरोप शिंदे यांनी केला.

भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडेंचा पत्ता कट करत डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे नाही-नाही म्हणताना काँग्रेसकडून पुन्हा रिंगणात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची शिंदेंना संधी आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांनी आव्हान दिल्याने  सोलापुरात तिहेरी लढत होत आहे.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी प्रचाराचा तोफा थंडावल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला म्हणजे उद्या मराठवाड्यातल्या 6, विदर्भातल्या 3 आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूरमध्ये मतदान होणार आहे. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर, भाजपच्या प्रीतम मुंडे, शिवसनेचे आनंदराव अडसूळ अशा दिग्गजांची अग्निपरीक्षा असणार आहे.

या दिग्गजांशिवाय पक्षाच्या इतर उमेदवारांसाठी स्टार प्रचारकांनी सभांचा धडाका लावला होता. दरम्यान प्रचारासाठी राजकीय पक्षांनी केलेली उठाठेव कितपत यशश्वी ठरलीय हे 18 एप्रिलला मतदानाच्या टक्केवारीनंतरच कळणार आहे.