मुंबई : जेएनयूचा विद्यार्थी शारजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या उर्वशी चुडावाला यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी मुंबई सत्र न्यायालयानं नामंजूर केला आहे. चुडावाला यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिसांनी देशद्रोहाचा आरोप ठेवला आहे.

शारजील इमामच्या विरोधात राष्ट्रद्रोहासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. त्याच्या समर्थनार्थ काही दिवसांपूर्वी आझाद मैदानमध्ये एलजीबीटीक्‍यू (समलैगिंक-बायसेक्‍शुअल-ट्रान्सजेन्डर-क्वीर) समाजघटकांच्यावतीने निदर्शन करण्यात आली होती. या आंदोलनामध्ये 22 वर्षीय चुडावाला यांनी शारजीलच्या समर्थनासाठी घोषणाबाजी केली होती. शारजील तुझं स्वप्न आम्ही पूर्ण करु, अशी घोषणाबाजी करुन उर्वशीनं देशाविरोधात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचे समर्थन केले आहे, असा आरोप सरकारी पक्षाने ठेवला आहे. मात्र तिने केवळ एकदाच घोषणा दिली आणि तो गुन्हा होऊ शकत नाही, तसेच केवळ घोषणा देणं म्हणजे सरकारविरोधात टीका होत नाही, असा दावा तिच्यावतीने करण्यात आला.

मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी हा युक्तिवाद अमान्य करत तिचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अर्ज करण्याकरीताही चुडावाला यांना मुदत दिली नाही. चुडावाला यांनी आंदोलनाआधी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टही लिहिली होती. सीएए विरोधात शारजील इमामने दिल्ली आणि अलिगढमध्ये चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप स्थानिक पोलिसांनी केला आहे.

मुंबईत LGBT परेडमध्ये शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा, 51 जणांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे 


काय आहे प्रकरण?


मुंबईत मागील शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या LGBT प्राईड परेडदरम्यान देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी घोषणाबाजी करणाऱ्या उर्वशी चुडावाला आणि आणखी 50 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस आता उर्वशी चुडावालाचा शोध घेत आहेत. या परेडदरम्यान उर्वशी चुडावाला नावाच्या मुलीने देशद्रोहाचा आरोप असलेल्या शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि शरजीलचं स्वप्न आम्ही पूर्ण करु असं म्हटलं होतं. शरजील देखील जेएनयूचा विद्यार्थी आहे. त्याने देशाचे तुकडे करण्यासंदर्भातील भाषण केलं होतं. देशातील विविध राज्यांमध्ये शरजील विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या शरजील दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरु आहे.

या घोषणाबाजीचा व्हिडिओ विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केला होता आणि म्हटलं होतं की मुंबईत हे काय होत आहे? राज्य सरकार हे सहन का करत आहे? याआधी मुंबईत महक मिर्झा नावाच्या मुलीनेही गेट वे ऑफ इंडियावर आंदोलनादरम्यान फ्री काश्मीरचे पोस्टर दाखवले होते. तिच्याविरोधातही मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही, असं फडणवीसांनी म्हटलं होतं.