मुंबई : कोरोना लसीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. लवकरच कोरोना व्हायरसवरील लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र या क्षणी प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न सतत निर्माण होत आहे की कोरोना लसीसाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतील? ही लस सर्वसामान्यांसाठी नेमकी कधी उपलब्ध असेल? ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची अॅस्ट्रेजेनिकासोबत चाचणी करणारे पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितलं की, भारतात कोरोनाच्या लसची किंमत 500 ते 600 रुपयांच्या दरम्यान असेल.
एका मुलाखती पूनावाला यांनी सांगितलं की, 2021 च्या पहिल्या तिमाहीत ऑक्सफोर्डच्या कोविड 19 लसचे सुमारे 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध होती. या लसीसाठी सामान्य लोकांना 500 ते 600 रुपये द्यावे लागतील. भारत सरकारला ही लस स्वस्त दरात दिली जाईल. भारत आमची प्राथमिकता असल्याचं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांनी म्हटलं आहे.
अमेरिकन औषध निर्माता कंपनी मोडेर्नाने सोमवारी जाहीर केले की कोविड 19 साठीची आमची लस 94.5 टक्के प्रभावी आहे. यापूर्वी, अमेरिका आणि जर्मनी यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या फायझर (Pfizer) आणि बायोटिक यांनी देखील अशीच घोषणा केली होती. या दोन्ही लसींचा तिसरा टप्प्यातील चाचणी दरम्यान चांगला निकाल लागला आहे आणि नियामकाच्या मान्यतेनंतर, लोकांना लस डोस देण्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू केले जाऊ शकते.
कोणतीही लस कोरोनावर पूर्णपणे मात करू शकत नाही; WHO च्या प्रमुखांचं वक्तव्य
मॉडर्ना आणि फायझर-बायोटेक या दोन कंपन्य़ांनी तिसर्या टप्प्यातील चाचणीदरम्यान मोठ्या प्रमाणात निकाल यशस्वी झाल्याची घोषणा केली आहे. तर सध्या किमान 10 कंपन्यांच्या लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. फायझरचा अभ्यास करणार्या स्वतंत्र पॅनेलने सांगितले की कोविड 19 रोखण्यासाठी ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे. असाच एक अभ्यास मॉडेर्नावर घेण्यात आला आणि त्यात ही लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचे आढळले. यूएस फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या (एफडीए) बेंचमार्क अंतर्गत मंजुरीसाठी 50 टक्के प्रभावी असणे आवश्यक आहे. म्हणून दोन्ही लसींना नियामक मंजुरी मिळणे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
Pfizer आणि मॉडर्ना लसींपैकी कोणती लस भारतासाठी जास्त फायदेशीर?
फायझर लस
फायझर लसीचं स्टोरेज करणं ही भारतात सर्वात मोठी अडचण ठरू शकते. फायझर लस -70 डिग्री तापमानात साठवावी लागते आणि वाहतूक करावी लागेल. याव्यतिरिक्त 5 दिवस फ्रिजमध्ये ठेवले जाऊ शकते. तसेच तीन आठवड्यांच्या आत या लसीचा दुसरा डोस घ्यावा लागेल.
मोडर्ना लस
मॉडर्ना लस भारतासाठी योग्य म्हणता येईल. या लसीला स्टोरेज आणि वाहतुकीसाठी -20 डिग्री तपमान आवश्यक आहे. तर 30 दिवसांपर्यंत ही लस रेफ्रिजरेटर तापमानात ठेवली जाऊ शकते. 12 तास ही लस घरातील तपमानावर देखील ठेवली जाऊ शकते. तर या लसीचा दुसरा डोस चार आठवड्यांच्या फरकांनी घ्यावा लागेल.