सातारा (Satara) : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) वन विभागाने (Forest Department) मोठी कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असलेल्या व्हेल माशाची उलटी (Whale Vomit) वन विभागाने जप्त केली आहे. व्हेल माशाच्या उलटीचं वजन सुमारे साडेसहा किलो असून त्याची किंमत सहा कोटी रुपये असल्याचं समजतं. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्यांमध्ये महाबळेश्वरमधील एका माजी नगरसेवकाचाही (Corporator) समावेश आहे.


सापळा रचून व्हेल माशाची उलटी जप्त


आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिकिलो एक कोटी रुपये दराने व्हेल माशाची उलटी विकली जाते. मात्र, तिच्या विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे तिची तस्करी सुरु असते. व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. साताऱ्यातील मेढा-महाबळेश्वर रोडवर कारवाई करत ही उलटी जप्त करण्यात आली. पोलिसांनी पाठलाग करुन आरोपींना ताब्यात घेतलं. जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटीचं वजन सुमारे साडे सहा किलो असून त्याची किंमत साडे सहा कोटी आहे.


व्हेल माशाची उलटी अतिशय मौल्यवान 


व्हेल माशाची उलटी केवळ बाजारात विकली जात नाही तर ती कोणत्याही हिऱ्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहे. व्हेल मासा हा पृथ्वीवरील असा जीव आहे, ज्याच्या उलटीला तरंगणारे सोने म्हणतात. व्हेल माशाच्या उलटी अॅम्बरग्रीस (Ambergris) या नावानेही ओळखली जाते. तज्ञांच्या मते, त्याला विष्ठा म्हणतात. म्हणजेच व्हेलच्या शरीरातून बाहेर पडणारा टाकाऊ पदार्थ. वास्तविक ते व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडते. व्हेल मासे समुद्रातील अनेक गोष्टी खातात. यामुळे, जेव्हा त्यांना त्या गोष्टी पचवता येत नाहीत तेव्हा ती बाहेर टाकते. अ‍ॅम्बरग्रीस हे राखाडी किंवा काळ्या रंगाचा घन पदार्थ असते. दगडासारखा दिसणारा हा पदार्थ मेणासारखा असतो.


व्हेल माशाच्या उलटीला इतकी मागणी का?


आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हेल माशाच्या उलटीची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असते. उंची दर्जाची आणि किमती अत्तरे, सेंट तयार करण्यासाठी या उलटीचा वापर होत असतो. यासह इतर कारणासाठीही उलटीची तस्कारी होत असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. मात्र व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, वन्यजीव अधिनियमानुसार त्याच्या हाताळणी विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.


हेही वाचा


Sangli Crime : सांगलीत पावणेसहा कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, तस्करी करणाऱ्या दोघांना अटक