सातारा : सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर आता आज महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे सुद्धा आज विराट शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजे यांच्या शक्ती प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे शक्तिप्रदर्शन जोरदार होण्यासाठी उदयनराजे यांनी खास करून बैठक आयोजित केली होती. यामध्ये जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आज सकाळी 11 वाजता साताऱ्यातील गांधी मैदानावरून रॅलीला सुरुवात होणार आहे. 


रॅली राजपथ मार्गे शेटे चौक, खालचा रस्ता, शिवतिर्थ या ठिकाणी जाणार आहे. तिथं छत्रपती शिवरायांच्या आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला हार घालून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे. या रॅलीसाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.


पेच सुटल्यानंतरच उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर


गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत होती. उदयनराजे भोसले यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी रणशिंग फुंकले होते. मात्र, त्यांची उमेदवारी काही मात्र निश्चित होत नव्हती. त्यांनी उमेदवारीसाठी दिल्लीमध्ये सुद्धा तीन दिवसांहून अधिक काळ तळ ठोकला होता. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. मात्र जाहीर मात्र झालेली नव्हती. दोन दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. 


राज्यातील काही मतदारसंघांचा महायुतीमध्ये पेच अजूनही सुटलेला नाही. त्यामध्ये सातारच्या जागेचा सुद्धा समावेश होता त्यामुळे हा पेच सुटल्यानंतरच उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आज ते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.


दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे यांना उदयनराजे भोसले यांच्या विरोधात रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे ही अत्यंत चुरशीची लढत होईल असं म्हटलं जात आहे. सातारा लोकसभेसाठी प्रथमच घड्याळ चिन्ह असणार नाही. सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाकडून सुद्धा दावा करण्यात आला होता. त्यांनी उदयनराजे भोसले यांना सुद्धा घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी प्रस्ताव दिला होता. मात्र, उदयनराजे भोसले यांनी कोणत्याही परिस्थितीत कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केल्याने अजित पवारांना मतदारसंघावर पाणी सोडावं लागलं आहे. 


उमेदवारी जाहीर होताच शशिकांत शिंदेंवर आरोप 


एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून सातारा उमेदवारीवरून चांगलाच खेळ रंगला होता. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर होतात त्यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात येत आहेत. आमदार महेश शिंदे यांनी नवी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांवरून आरोप केले होते. मात्र, शशिकांत शिंदे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. नरेंद्र पाटील यांनी सुद्धा शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप केले. त्यामुळे आता  राजेंचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आरोपांना अधिक धार येणार आहे. शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे आमदार आहेत, तर उदयनराजे भोसले राज्यसभेवर आहेत. दोन्ही नेते आता एकमेकांविरोधात ठाकले असून लोकसभेचे मैदान कोण मारणार याचे उत्तर चार जून रोजीच मिळणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या