Satara News : साताऱ्यातील कोयना धरणा नजीक असलेल्या पाटण तालुक्यातील हेळवाक गावामध्ये कुत्र्याचा पाठलाग करताना तो थेट एका शेतकऱ्याच्या घरात घुसल्याचा थरारक प्रसंग घडला. सुधीर कारंडे यांच्या राहत्या घरात बिबट्या शिरला. मात्र, त्यांनी केलेल्या धाडसाने बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाले.  


सुधीर कारंडे यांच्या घरात बिबट्या शिरला त्यावेळी पाऊसही कोसळत होता. त्याचवेळी लहान बाळ आणि पत्नी घरातून आत बाहेर करत होते. घराच्या आंगणात त्यांचे पाळीव कुत्रे आणि त्यांची पिल्ले खेळत होती. त्याचवेळी बिबट्याने घराच्या दरवाजात असलेल्या सुधीरच्या दिशेने बिबट्याने झेप मारली. सुधीर बाजूला झाले, पण बिबट्या दारावर येऊन आदळला. दरवाजातून आत पळालेल्या कुत्र्याचा त्याने पाठलाग सुरु ठेवल्याने तो थेट घरात घुसला. 


बिबट्या आत कुत्र्याच्या मागे शिरल्याचे पाहताच कारंडे यांनी घराचे दार बंद केले. दरम्यान, या घटनेची माहिती त्यांनी वन विभागाला दिल्यानंतर वनविभागाची टीम पोहोचली व बिबट्यास यशस्वीरीत्या पिंजऱ्यात जेरबंद केले. सदर बिबट्या हा लहान असून तर मागील उजव्या पायाने तो लंगडताना दिसून आला. 


सदर बिबट्यास वैद्यकीय पुढील उपचारासाठी विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी हलविण्यात येणार आहे. कोयनेच्या जंगल परिसरातील अनेक जंगली जनावरांचा गावागावात वावर वाढल्याचे आलीकडच्या काळात दिसून येत आहे.  रात्रीची नाईट सफारी, काजवा महोत्सव, कास महोत्सव अशा वन विभागाच्या अनेक उपक्रमातून या जंगली जनावरांच्या आदिवासातील मानवी प्रवेशातून कदाचित या अशा घटना घडत असतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


इतर महत्वाच्या बातम्या