सातारा : सातारा जिल्ह्यातील (Satara News) खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव निर्माण झाल्याने रविवारी जाळपोळ झाल्याची घटना घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणात सातारा पोलिसांकडून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी औंध विश्रामगृहात घडलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकरी जितेंद्र डुडी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.  


तणाव निवळण्यासाठी आणि शांततेसाठी पुसेसावळी आणि आसपासच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी या प्रकरणात १०० अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


औंध पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल


यावेळी फुलारी यांनी पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. सोशल मीडियावर कोणतीही चूकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा व शांतता राखावी आणि पोलीस व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. दरम्यान, औंध पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह मजकुराच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाळवेकर करत आहेत.घटनेतील खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत 23 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे सुनील फुलारी यांनी सांगितले.


नेमका प्रसंग काय घडला?


औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी 10 सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्टवर दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांकडे विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात सदर आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आल्यानंतर तणाव निर्माण झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास जमलेल्या जमावाकडून दुचाकी व चार चाकी वाहने पेटवून देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावस पांगवले होते. यावेळी अतिरिक्त   कुमक मागवण्यात आली होती. सदर मारहाणीमध्ये एकूण दहा व्यक्ती जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती चांगली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या