Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे म्हसवड शहराला जोरदार फटका बसला आहे. शिंगणापूर रस्त्यालगतच्या भागात पाण्याचा वेढा निर्माण झाला असून रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. अचानक पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
माण तालुक्यामध्येही मुसळधार पाऊस
दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यामध्येही मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे माण तालुक्यात माणगंगा नदीला पूर आला आहे. म्हसवड येथील माणगंगा नदीने पुराचे पातळी ओलांडली आहे. त्यामुळे म्हसवड नगरपरिषदेकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आलं आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे.
कोयना धरणातून विसर्ग वाढवला
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे 1 फुटांनी उघडून 6400 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणाचा पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिटमधून 2100 क्युसेक विसर्ग सुरू असून असा एकूण कोयना नदीमध्ये 11,700 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर धरणातून विसर्ग वाढू शकतो त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील 68 पैकी 21 मंडळांमध्ये अतिवृष्टी
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील 68 पैकी 21 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव आणि मिरज तालुक्यातील बेळंकी मंडळात सकाळी आठ वाजेपर्यंत मागील 24 तासात 90.8 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व पाचही म्हणजे ढालगाव, देशिंग, कुणी, हिंगणगाव व कवठेमहांकाळ मंडळात 73.5 ते 90.8 मिलीमीटर पाऊस झाला. अग्रणी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील तासगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तासगाव तालुक्यातील मांजर्डे, विसापूर, येळावी, मणेराजुरी,सावळज आणि वायफळे मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या