Udayanraje Bhosale News : शिवप्रताप दिनानिमित्त (Shiv Pratap Din) साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावरील (Pratapgad Fort) कार्यक्रमांना खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) उपस्थित राहणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. त्याचबरोबर उदयनराजे यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले या देखील प्रतापगडावरील कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी किल्ले प्रतापगडावरील कार्यक्रमांना न जाण्याचा निर्णय घेतला आहे.


शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने आज किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थित अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रतापगडावरील भवानी मातेची पूजाही करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत. या कार्यक्रमांना उदयनराजेंनी उपस्थित राहावं यासाठी काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न सुरु होते. परंतु उदयनराजेंकडून त्याला प्रतिसाद दिला नाही अशी माहिती आहे. 


मेळाव्याच्या तयारीसाठी उदयनराजेंनी बैठक बोलावली
त्याचवेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी अकरा वाजता साताऱ्यातील लेक व्ह्यू या हॉटेलमध्ये 3 डिसेंबर रोजी किल्ले रायगडावर होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीसाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत 3 डिसेंबरच्या रायगडावरील निर्धार शिवसन्मानाचा या मेळाव्याच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांबरोबर चर्चा होणार आहे. त्यामुळे उदयनराजे प्रतापगडावरील आजच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. शिवाय किल्ले प्रतापगड आणि परिसर हा उदयनराजेंच्या खाजगी मालकीचा आहे. गडावर आज होणाऱ्या कार्यक्रमाच्या पोस्टर्सवर उदयनराजेंचे फोटो छापण्यात आले आहेत. त्यामुळे उदयरानराजे यांचं या कार्यक्रमाला हजर राहणं सरकारसाठीही महत्त्वाचं होतं.


प्रतापगडाला विद्युत रोषणाई, गडावर शिवमय वातावरण 
छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या गाथांमधील एक दिवस म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याला आफजल खानाचा केलेला वध. हा इतिहास ऐकला की अंगावर शहारे येतात आणि याच शौर्याचा दिवस म्हणून शिवप्रताप दिन म्हणून प्रतापगडावर साजरा केला जातो. या दिवशी गडावर ढोल-ताशांचा गजर होतो. शिवरायांची प्रतिकृती असलेली पालखी देवीच्या मंदिरातून अश्वारुढ असलेल्या गडावरच्या शिवरायांच्या पुतळ्यापाशी जाते. अविस्मरणीय असा हा सोहळा व्हावा यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या निमित्ताने संपूर्ण प्रतापगड विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. इतकंच काय तर लेझरच्या सहाय्याने गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा ही दाखवली जाणार आहे. शिवमय अस वातावरण गडावर या दिवशी पाहायला मिळतं.