कराड : साताऱ्यातील (Satara News) दुष्काळी पट्टा आता नावालाही राहणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज कराडमध्ये बोलताना केला. कराडमध्ये आजपासून (17 जानेवारी) कृष्णा कृषी औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. या प्रदर्शनात 11 देशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात जवळपास 400 स्टॉल सहभागी झाले आहेत.


कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी फडणवीस आणि उदयनराजे भोसले यांनी थेट बैलगाडीवरून एन्ट्री घेतली. तोच धागा पकडून राज्याच्या राजकारणाचा कासरा आपल्या हाती घ्यावा, असा सूर उदयनराजे भोसले यांनी आळवला. उदयनराजे यांनी राजकीय टोलेबाजी केल्यानंतर शेवट त्यांच्याकडून महाविकास आघाडीच्या नावाने झाले. तीच दुरुस्ती फडणवीस यांनी करताना टोलेबाजी करत सूचक इशारा सुद्धा दिला. 


मुंबईत रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे


देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, मुंबईत रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. त्यामुळे हे वक्तव्य कोणाला उद्देशून होते? याची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून काल (17 जानेवारी) जनता न्यायालयातून आमदार अपात्रता प्रकरणाची चिरफाड करण्यात आली होती. त्यामुळे फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याची टायमिंग लक्षात येते. 


दरम्यान, फडणवीस पुढे म्हणाले की, वीज निर्मितीचे शेतात प्लान्ट होतील. पुढील काळात पाण्याचे दर वाढवण्याची वेळ येणार नाही. साखर उद्योगासाठी निर्णय पीएम मोदी यांनी घेतले. यापूर्वी तसे निर्णय झाले नाहीत. मोदींना काय कळते? असेही आरोप झाले. आता महाराष्ट्र सरकार देखील शेतकऱ्याला 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेत आहे. पश्चिम महाराष्ट्रात इरिगेशनचे प्रकल्प रखडलेले होते ते आम्ही मार्गी लावत आहोत. त्यामुळे साताऱ्यातील दुष्काळी पट्टा आता नावालाही राहणार नाही, असा दावा फडणवी यांनी केली. 40 हजार शेतकरी पिक विमा घेत होते, आता 2 लाख शेतकऱ्यांनी तो घेतला असल्याचेही फडणवीस म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या