Satara News : नववर्षाच्या (New Year) स्वागताला किंवा वीकेण्डला सातारा (Satara) जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर (Vasota Fort) जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण वासोटा किल्ल्यावर 30 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान पर्यटकांना (Tourist) बंदी घालण्यात आली आहे. वन विभागाने (Forest Department) हा निर्णय घेतला आहे. पर्यटक तसंच गर्दीतील हुल्लडबाजांचा जंगली प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रेकर्स, दुर्गप्रेमी, पर्यटकांना वासोटा किल्ल्याचं आकर्षण
वासोटा हा सह्याद्री पर्वतरांगानमधील सातारा-रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवरचा एक भाग आहे. जावळी तालुक्याच्या दुर्गम भागात कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गसंपन्न गाभा क्षेत्रात शिवसागर जलाशयाच्या पलीकडे वासोटा किल्ला आहे. छत्रपती शिवरायांच्या या किल्ल्याचं ट्रेकर्स, दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमीसह पर्यटकांमध्ये आकर्षण आहे.
वन्यजीवांना हानी पोहोचू नये यासाठी पर्यटकांना बंदी
सुट्टीच्या दिवशी, वीकेण्डला ट्रेकर्स तसंच पर्यटकांची पावलं या गडाकडे वळतात. अनेकांना निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडतं. त्यातच आता नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. या स्थळांमध्ये वासोटो किल्ल्याचाही समावेश आहे. त्याच पार्श्वभूमीवर पर्यटक वासोटा किल्ल्याकडे येतील ही शक्यता लक्षात घेऊन किल्ल्यावर त्यांना तीन दिवस बंदी घालण्यात आली आहे. वासोटा किल्ला हा वन्यजीव विभागाच्या गाभा क्षेत्रात येत असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढून निसर्गसंपदेला तसंच वन्यजीवांना कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी पर्यटकांना शुक्रवारपासून (30 डिसेंबर) रविवारपर्यंत (1 जानेवारी) प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
किल्ल्यासह जंगल परिसरात आढळल्यास कायदेशीर कारवाई
वन विभागाने कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बामणोली, तापोळा विभागातील बोट चालकांना याबाबत सूचना दिली आहे. या काळात वासोटा किल्ला परिसरासह अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात कोणी व्यक्ती बेकायदेशीररित्या आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बामणोली वन्यजीव वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांनी दिली.
लोणावळ्यात कोरोना नियमांचं पालन करा, प्रशासनाचं आवाहन
पर्यटननगरी लोणावळ्यात आता कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. त्याअनुषंगाने हॉटेल मालकांनीही उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा थैमान घातलं आहे. तिथला नवा व्हेरिएन्ट बीएफ सेव्हन आता आपल्या वेशीवर आवासून उभा आहे. त्यामुळेच भारत सरकार खडबडून जागं झालं आहे. अशातच नववर्षाचं स्वागत होणार आहे. लोणावळ्याकडे मोठ्या संख्येने पर्यटकांचे पाय वळू लागल्याने प्रशासनाने कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. पर्यटकांना मास्क, सॅनिटाईजर आणि सोशल डिस्टनसिंग राखण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. तसेच हॉटेल, लॉजिंग आणि रिसॉर्ट मालकांना या उपाययोजना राबवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.