सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या सातारा लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी अखेर घोषित करण्यात आला. शशिकांत शिंदे यांना संधी देण्यात आली असून त्यांची लढत संभाव्य उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याशी होणार आहे. उमेदवारीची वाट न पाहता उदयनराजे भोसले यांनी मतदारसंघात प्रचार सुरु केला आहे. याबाबत बोलताना उदयनराजे यांनी प्लॅनिंग केलं असून ते जाहीर केल्यास विरोधकाला समजणार आणि सर्व सोपं होणार असून निकालानंतर सर्व प्लॅनिंग सांगतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मी कराड सातारा असा कधीच दुजाभाव करत नसल्याचेही ते म्हणाले.


हे मोठं लग्न, काळजी करू नका  


उदयनराजे भोसले म्हणाले की, वेळ थोडा असल्याने शिरवळपासून दौऱ्याला सुरुवात केली आहे. संपूर्ण जिल्हा दौरा काढला असून बऱ्यापैकी भाग पूर्ण केला आहे. जे इच्छूक असतील त्यांना आता अशक्य असून सुपर मॅनच पाहिजेत असे ते म्हणाले. लोकांसमोर विकासाचा मुद्दा घेऊनच जात असून मी राजकारण केलं नसल्याचे म्हणाले. भाजप राष्ट्रीय पक्ष असल्याने टप्याटप्याने नावे येत आहेत. मी राज्यसभेचा खासदर आहे. उमेदवार म्हणूनच मी तुमच्याशी बोलत आहे, भाजप लवकरच नाव जाहीर करेल. हे मोठं लग्न असल्याने तुम्ही काळजी करु नका. त्यांनी पुढे सांगितले की, अति आत्मविश्वासामध्ये कोणी जाऊ नये. हा काँग्रेचा मुळचा बालेकिल्ला आहे. कृष्णा खोरे विकास मंडळाची योजना का राबवली गेली नाही? गोपीनाथ मुंडेंना त्यावेळेस मी भेटून तो प्रकल्प मंजूर करुन घेतल्याचे ते म्हणाले. मी सकारात्मक राजकारण करतो, माझ्या जाहीरनाम्यातून सर्व माहिती मिळेल, असे त्यांनी सांगितले. 


शांत करण्यासाठी साखर कारखाने वाटले 


उदयनराजे म्हणाले की, काँग्रेसच्या काळात कारखाने खिरापत वाटल्याप्रमाणे वाटले. शांत करण्यासाठी साखर कारखाने वाटले. अनेक कारखाने तयार झाले. मात्र, त्यांना ऊस नव्हता. तसेच जरंडेश्वर कारखान्याचे झाले. चुकीच्या व्यवस्थापनामुळे प्रायव्हेटायजेशन झाल्याचे ते म्हणाले. मराठा आरक्षणावर बोलताना उदयनराजे म्हणाले की, जातीनिहाय जणगणना 10 वर्षानंतर केली असती तर? मी कोणत्याही समाजाचे समर्थन करत नाही.भविष्यात याचे काय परिणाम होतील. यातून समाजात किती तेढ निर्माण होत आहेत. जरांगे पाटील सर्वांना नोकऱ्या मिळू शकत नाही. मराठा समाजातील अनेक लोक धुणीभांडी करतात. काम धंदा करुन जर नोकऱ्या मिळनार नसतील तर काय उपयोग? अशी विचारणा त्यांनी केली. 


उमेदवारी जाहीर होताच शशिकांत शिंदे काय म्हणाले?


दुसरीकडे, सातारा लोकसभेला आमदार शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी शरद  पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच मागील मताधिक्यावर बोलताना ते म्हणाले की, या निवडणुकीत जनतेच्या मनात सुप्त इच्छाशक्ती आहे. सरकारबद्दल नाराजी आहे. नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक लोकांनी मला फोन केले. त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या आणि शरद पवार यांच्यासोबत आहे. आता तत्वांचा विषय आहे, माझी आणि त्यांची (उदयनराजे भोसले) काही वैयक्तिक लढाई नाही. ही निवडणूक जनतेनं हातात घेतल्यास फार मोठी आणि सर्वांच्या कल्पनेपलीकील क्रांती होईल. पक्षाने माझ्यावर विश्वास दर्शवला असून भविष्यकाळात साताऱ्याचा एक आदर्श खासदार होण्याचा मी प्रयत्न करेन, असेही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या