फलटण (सातारा) : सातारा जिल्ह्यातील (Satara Crime) फलटण शहरात रविवारी दिवसाढवळ्या व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करत कोयता आणि तलवारीने लुटल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात व्यापारी जखमी झाला आहे. अरिंजय दोशी (वय 72) असे त्यांचे नाव आहे. फलटण शहरात मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या उघड्या मारुती परिसरातील हुतात्मा स्मारकासमोर ही घटना घडली. हल्लेखोरांनी दुकानातील पैशांचा गल्ला उचलून नेला. रविवारी ही घटना घडली. हल्लेखोरांनी अनेक दुकांनामध्ये धाक दाखवून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यापाऱ्यांध्ये दहशत निर्माण झाली आहे.
व्यापाऱ्याच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न
हल्लेखोरांना व्यापारी अरिंजय दोशी यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तो चुकवला. हल्लेखोरांनी शेजारच्या दुकानांमध्येही कोयता आणि तलवारीचा धाक दाखवून खंडणीची मागणी केली. बारामती चौकामधील जनरल स्टोअर्सच्या दुकानावर हल्लेखोरांनी खंडणीसाठी दगडफेक केली.
एकाच्या हातात तलवार, दुसऱ्याच्या हाती कोयता
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार रविवार बाजाराचा दिवस असल्याने दिवसभर मोठी गर्दी होती. याठिकाणी हुतात्मा स्मारकसमोर सुहास रेडिमेड व मॅचिंग सेंटर दुकान आहे. या दुकानात दोन हल्लेखोर दुकानात घुसले. एकाच्या हातात तलवार तर दुसऱ्याच्या हाती कोयता होता. दोघांनी धाक दाखवून खंडणीची मागणी करत गल्ला उघडून रक्कम काढून घेतली. यावेळी दोशी यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्लेखोरांनी दुकानातील गल्ला उचलून नेला. त्यानंतर अन्य एका दुकानात हल्लेखोरांनी नोटा घेत चिल्लर टाकून दिली. शेजारील दुकानांमध्येही खंडणीची मागणी केली. हल्लेखोरांनी बारामती चौकामधील हिमालय जनरल स्टोअर्समध्येही दुकानाच्या मालकाकडे खंडणीची मागणी करून दुकानावर दगडफेक केली.
सशस्त्र रिलायन्स ज्वेल्स दरोड्यात आणखी नऊ संशयितांची नावं निष्पन्न
दुसरीकडे, सांगली शहरातील (Sangli News) मार्केट यार्ड परिसरात रिलायन्स ज्वेल्स या शोरूमवरील दरोडाप्रकरणी अन्य नऊ संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. यामध्ये पोलिसांकडून या दरोड्यातील आरोपी अंकुरप्रताप रामकुमार सिंहची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत या सर्वांची माहिती मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. अंकुरला ताब्यात घेतल्यानंतर बऱ्याच घटनांचा उलगडा होत आहे. ज्वेल्सवरील सशस्त्र दरोड्याची तयारी त्यांनी कोल्हापूर आणि नांदेडमधून केली होती. या सशस्त्र दरोड्याची उकल करण्यासाठी सांगली पोलिसांनी परराज्यात 50 दिवसांपेक्षा जास्त काळ राहून आरोपीचे धागेदोरे शोधून काढले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या