मुंबई : भारतातील महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा फडकवत आहेत. देश-विदेशातील भारतीय महिलांची क्षमता ओळखून त्यांना सन्माननीय पदांची जबाबदारी दिली जात आहे. आजच्या महिला सर्व काही करू शकतात. स्त्रिया आकाशात विमान उडवण्यापासून ते रुळांवरून ट्रेन चालवण्यास सक्षम आहेत. अशा यशस्वी महिलांमध्ये सातारा जिल्ह्यातील सुरेखा यादव ( Surekha Yadav) यांचाही समावेश आहे. सुरेखा यादव या भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिल्या लोको पायलट (Loco Pilot ) ठरल्या आहेत.
आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी आज सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (vande bharat express) चालवली. यावेळी सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले आहे.
या कामगिरीबद्दल सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक आठवर सत्कार करण्यात आला. त्यावेळी सुरेखा यादव म्हणाल्या, "नवीन काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे. गाडी योग्य वेळी सोलापूरहून निघाली आणि वेळेच्या पाच मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली. ट्रेन चालविणे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, इतर क्रू मेंबर्ससोबत समन्वय, ट्रेन चालवण्यासाठी सर्व पॅरामीटर्स पाळणे यांचा समावेश होतो."
सुरेखा यादव मूळच्या सातारा जिल्हातील
आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचा जन्म 2 सप्टेंबर 1965 रोजी सातारा येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल सातारा येथून झाले. पुढील अभ्यासासाठी त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम केला आणि नंतर इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचा डिप्लोमा मिळवला. 1988 मध्ये त्या भारतातील पहिली महिला लोको पायलट बनल्या. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या