सातारा : राज्याच्या राजकारणात खूप कमी मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणताही ठपका नाही, त्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. काही मित्र असे असतात ज्यांच्याकडे पाहून समाधान वाटतं, एकनाथ शिंदे हे त्यापैकीच एक असल्याचं नाना पाटेकर म्हणाले. नाम फाऊंडेशन, (Naam Foundation) टाटा मोटर्स (Tata Motors) आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरण परिसरात 'गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार' ही योजना राबवली जात आहे. त्याचा शुभारंभ हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी नाना पाटेकर बोलत होते.
काय म्हणाले नाना पाटेकर?
नाना पाटेकर म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्यापासून ओळखत आहे. आमची मैत्री जुनी आहे, मी त्याच्यांकडे काही मागत नाही. काही राजकीय मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणतेही ठपके नाहीत, त्यांच्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. शिंदेंनी मुख्यमंत्रिपद भूषवलं, पण कुणीही त्याच्याकडे बोट दाखवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांना सुद्धा मी जवळून ओळखतो. त्यांचे सुद्धा काम चांगले आहे."
धरणातील गाळ काढला पाहिजे
नाना पाटेकर पुढे म्हणाले की, "नाम फाउंडेशनचा टाटा समूह आणि आणि राज्य सरकार सोबत करार झाल्याने आमचे काम अधिक सोयीचे झाले आहे. धरणातून गाळ काढल्यास आणि तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वापरल्यास शेतीची सुपिकता वाढते. माझ्या खडकवासल्यातील शेतीमध्ये याचा वापर केला. त्यामुळे उत्पादनात दुप्पट वाढ झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे पाण्याचा साठाही वाढतो आणि शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढेल.
कोयना धरणातील गाळ काढण्याचे काम पुढच्या वर्षी अधिक प्रमाणात सुरू करावे असे आवाहन नाना पाटेकर यांनी केलं.
नाम फाऊंडेशनच्या मदतीने धरणातील गाळ काढणार
एकनाथ शिंदे म्हणाले की, "नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबवली जात आहे. नाम फाऊंडेशनच्या वतीने राज्यभरात हे काम सुरू आहे. चिपळूण, महाड आणि खेडमध्ये याचे परिणाम दिसतात. त्यामुळे पुराती तीव्रता कमी झाल्याचं दिसतंय. कोयना धरण आणि बॅक वॉटर परिसरातली त्याचे सकारात्मत परिणाम दिसत आहेत. याची व्याप्ती आता वाढवली जाणार आहे. धरणाचा गाळ काढणे याला पर्याय नाही. त्यावर मागच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. त्यासाठी वेगवेगळे विभाग आणि नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून गाळ काढण्याचं काम केलं जाणार आहे."
सिनेमा बघायला वेळ मिळत नाही. पण नाना हे आवडते अभिनेते आहेत. त्यामुळे कोविड झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये असताना नानांचे चित्रपट पाहिल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.