Ramraje Naik Nimbalkar: राज्यातील विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याची चर्चा आहे. रामराजे नाईक निंबाळकरांना साताराच्या वडूज पोलिसांनी समन्स पाठवलं आहे. उद्या (शनिवारी) सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तुषार खरातांकडून मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांना (Ramraje Naik Nimbalkar) चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणात शरद पवार गटाचे नेते सामील असल्याचा आरोप जयकुमार गोरेंनी केला होता. रामराजेंना समन्स पाठवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

Continues below advertisement

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलीस यांच्याकडून चौकशीसाठी समजपत्र पाठवण्यात आलं आहे.  जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर समन्स पाठवण्यात आलं आहे. उद्या सकाळी 11 वाजता वडूज पोलीस ठाण्यात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात 12 लोकांना चौकशीसाठी नोटीस पाठवल्या आहेत. खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह पत्रकार आणि त्यांच्या संपर्कात असलेले काही कार्यकर्ते यांना नोटिसा बजावल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं प्रकरण काय?

कराड तालुक्यातील एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे ग्रामविकासमंत्री व भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. या प्रकरणातील संबंधित महिलेने जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर आरोप केले होते. मला गेल्या सहा वर्षांमध्ये अनेकदा मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला होता. ज्यावेळी मला पत्र आलं त्यावेळी मी त्रास होत असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर थांबून याबाबतची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षकांना घटनेबाबत सांगितली. मात्र, त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी कोणतीही दखल घेतली नाही. माझी बदनामी होत असल्याचं त्या महिलेने म्हटलं होतं, यावरून मंत्री गोरेंना विरोधकांनी धारेवर धरलं होतं, त्यानंतर या प्रकरणात कारवाई करत संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Continues below advertisement

या प्रकरणी 'लय भारी' या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक करण्यात आली होती. भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुषार खरात यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. तुषार खरात यांच्यावर अॅट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी इत्यादी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडूज, दहवडी, म्हसवड, तलभीड, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप तुषार खरात यांच्यावर करण्यात आला आहे.

गोरे यांनी यावर अधिवेशन चालू असताना स्पष्टीकरण दिलं होतं, "2017 साली माझ्याविरोधात एक गुन्हा दाखल झाला होता. 2019 साली या प्रकरणी निकाल लागला. निकालाची प्रत माझ्याकडे आहे. निकालामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे." याप्रकरणी आता चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील समन्स पाठवण्यात आलं आहे.