Koyna Dam Rain : राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नद्या, नाले, धरणे दुधडी भरून वाहू लागली आहेत. महाबळेश्वर कोयना परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासात महाबळेश्वरमध्ये 110 मिलिमीटर तर कोयना परिसरात 95 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात पुन्हा पाण्याची आवक वाढली आहे. पुन्हा दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. (koyna dam area rain increase 95 mm of rain recorded in 24 hours)


राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला


मागील काही दिवसांपासून राधानगरी धरणाच्या पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज (रविवारी) सकाळी 5 वाजून 51 मिनीटांनी वाजता सहा क्रमांकाचा दरवाजा खुला झाला आहे. या एका दरवाजातून 1480 क्यूसेक्स व वीज गृहातून 1500 क्यूसेक्स असा एकूण 2980 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे. दिवसभरात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाचे आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. यामुळे नदी काठाच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.चोवीस तासात धरण क्षेत्रात 84 मिमी पाऊस झाला असून धरणात 8331.18 इतका पाणीसाठा असून पाणीपातळी 347.34 फूट इतकी आहे.


राज्यात पुढील 3-4 दिवस जोरदार पावसाची शक्यता


येत्या तीन ते चार दिवसांत राज्यभरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. मराठवाडा वगळता बहुतांश भागात गुरूवारपर्यंत (29 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे.


सिंधुदुर्गात रात्रभर मुसळधार पाऊस


अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात दोन दिवस मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रातभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे जिल्हातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सध्या जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने समुद्रात मासेमारीसाठी मच्छीमारांनी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.


राज्यात कोणत्या विभागाला कोणता इशारा 


 रेड अलर्ट - पुणे, सातारा - रविवार (25 ऑगस्ट) अतिवृष्टी 
ऑरेंज अलर्ट - पालघर, जळगाव, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा - (25, 25, 27 ऑगस्ट) मुसळधार 
यलो अलर्ट - पालघर (26,27), ठाणे, सिंधुदूर्ग (27) रायगड, रत्नागिरी (28) धुळे (25,26) नगर, नंदुरबार (25), जळगाव (26), पुणे आणि सातारा (26,27), अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ (25 ते 28)