सातारा : अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन शरद पवार (Sharad Pawar) यांनी घुमजाव केलं आहे. "अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही," असं शरद पवार म्हणाले. सुप्रिया (Supriya Sule) त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. साताऱ्यात (Satara) माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं.


शरद पवार हे आमचेच नेते आहेत. कोणी वेगळा निर्णय घेतला तर पक्षात फूट पडली असं म्हणायचं काही कारण नाही, असं शरद पवार यांनी आज सकाळी बारामतीमधील (Baramati) पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन एकच खळबळ उडाली होती. शिवाय संभ्रमावस्था देखील निर्माण झाली होती. 


'सुप्रिया सहजपणे बोलत असतील तर राजकीय अर्थ काढू नये'


शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर (Kolhapur Visit) आहेत. बारामतीहून साताऱ्यात पोहोचल्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबतच्या वक्तव्यावर भाष्य केलं. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देताना शरद पवार म्हणाले की, "अजित पवार आमचे नेते आहेत असं मी म्हणालो नाही. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही." "आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे कुणाचेही नेते नाहीत," असं शरद पवार यानी स्पष्ट केलं.


एकदा संधी दिली, परत संधी द्यायची नसते, मागायची नसते : शरद पवार


"फूट म्हणजे एखादा मोठा गट फुटला गेला तर त्याला फूट म्हणतात. आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पहाटे शपथविधी झाला त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी द्यायची नसते आणि मागायची नसते," असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार हे पक्षात परत येतील का प्रश्नाचं अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं.


शरद पवार यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणतात... नो कमेंट्स


दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल अजित पवार यांना विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी 'नो कमेंट्स' असं म्हणत कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला.   


बावनकुळे म्हणतात शरद पवार आणि सुप्रिया सुळे लवकरच भाजपला पाठिंबा देतील?


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरुन शरद पवार यांनी अतिशय खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली. "माझी त्यांची फार ओळख नाही. अलिकडेच त्यांना ओळखतो. साधारण या पदावर राहणाऱ्या व्यक्तीला काहीतरी तारतम्य ठेवायची एक कल्पना असते. पण ते ज्या पद्धतीने बोलतायत, की आम्ही लोकांनी यांच्यावर टीका करु नये, त्यांच्यावर टीका करु नये. उद्या त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर टीका केली तर कदाचित ते म्हणू शकतात. पण जे आमच्या पक्षातील लोक जे सोडून गेले त्यांच्यावर टीका केली तर याची चिंता बावनकुळेंना का वाटते कळत नाही. त्याबाबत यांचं मार्गदर्शन आम्ही मागितलं नाही. याचा अर्थ ते जे बोलतात त्यामध्ये तारतम्य नाही, ज्याच्या बोलण्यात तारतम्य नाही, त्याला फारसं एन्टरटेंट करु नये," असं शरद पवार म्हणाले.


VIDEO : Sharad Pawar Full PC : अजित पवार आमचे नेते असं मी म्हणालो नाही, शरद पवार Uncut



संबंधित बातमी


अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट पडली म्हणायचं कारण नाही : शरद पवार