बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल शरद पवारांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. "अजित पवार आमचेच नेते आहेत, काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचं कारण नाही," असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. ते बारामतीमध्ये (Baramati) पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. विशेष म्हणजे अशाच आशयाचं वक्तव्य गुरुवारी (24 ऑगस्ट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं होतं. त्या वक्तव्याला आज थोरल्या पवारांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न राजकारणात रस असणाऱ्यांना पडू लागला आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचं कारण नाही : शरद पवार
राष्ट्रवादीत फूट नाही, अजितदादा आमचेच नेते आहेत असं काल काहींनी जाहीर केलं, असं पत्रकारांनी संवादादरम्यान म्हटलं. यावर शरद पवार म्हणाले की, "ते आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे."
राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमचे ज्येष्ठ नेते : सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कालच राष्ट्रवादीच फूट पडलेली नसून अजित पवार आमचे नेते असल्याचं म्हटलं होतं. "आमच्यापैकी काही जणांनी वेगळा निर्णय घेतला आहे, मात्र राष्ट्रवादीत अजिबात फूट पडलेली नाही. राष्ट्रवादीचे देशाचे अध्यक्ष शरद पवार, तर महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या दोघांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो. तर अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतल्यामुळे त्यांची तक्रार आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दिलेली आहे. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहतोय," असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.
शरद पवारांचं मनपरिवर्तन होईल : चंद्रशेखर बावनकुळे
शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण घटकांसाठी अनेक योजना येणार आहेत. त्या संपूर्ण योजनांवर शरद पवार यांचं मनपरिवर्तन होईल. अजित पवार यांचं जसं झालं तसंच शरद पवार यांचंही होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते अमरावतीमध्ये बोलत होते.
Sharad Pawar Full PC : राष्ट्रवादीत फूट पडली नाही, शरद पवारांचा दावा
हेही पाहा
Supriya Sule : अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते... सुप्रिया सुळेचं वक्तव्य नेमकं काय?