सातारा : उपमख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या मूळ गावी आले आहेत. त्याच्या सोबत खासदार श्रीकांत शिदे हेदेखील दरे गावी पोहोचले आहेत. गावातील हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. शिंदेंचा हा दौरा तीन दिवसाचा असून या दरम्यान ते पूर्णपणे विश्रांती घेणार असल्याचं त्यांच्या निकवर्तीयांकडून सांगितलं जात आहे.


या आधी मुख्यमंत्रिपद भाजपला मिळणार आणि शिंदेंच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद येणार हे निश्चित झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे दरे गावी आले होते. त्यावेळीही तीन दिवस ते पूर्णवेळ गावी होते. या दरम्यान महायुतीच्या महत्त्वाच्या बैठका त्यांच्या अनुपस्थितीमुळे होऊ शकल्या नव्हत्या. 


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील दरेगाव. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी असतानाही शिंदे त्यांच्या मूळ गावी अधून-मधून येत असायचे. 


शपथविधीच्या आधीही शिंदे त्यांच्या मूळ गावी


राज्यात महायुती सरकारला मोठं बहुमत मिळालं. पण मुख्यमंत्रिपद मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार हे स्पष्ट झालं. त्यावेळी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मूळगावाची वाट पकडली. मात्र एकनाथ शिंदे हे नाराज नसून ते आजारी असल्याने आराम करण्यासाठी गावी गेल्याची शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं. 


आजारी पडल्याने डॉक्टरांनी शिंदेंना आराम करण्याचा सल्ला दिला आणि एकनाथ शिंदेंनी पक्षाच्या आणि महायुतीच्या सगळ्या बैठक रद्द केल्या होत्या. एकनाथ शिंदे दरे गावात गेल्यानं महायुतीची प्रस्तावित बैठक खोळंबली होती. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याची देखील चर्चा सुरू झाली होती.