Maharashtra Cabinet Portfolio : बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तसेच अनेक रुसव्या फुगव्याच्या मालिकेनंतर महायुती सरकारमधील मंत्र्यांना शपथविधीनंतर एका आठवड्यानंतर खातेवाटप करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि उर्जा खातं आपल्याकडेच ठेवलं असून शिंदेंचा दबाव झुगारून दिला आहे. शिंदे यांनी गृहच्या बदल्यात गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास अशी खाती घेत भरपाई केली आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यानंतर शिंदे यांचा मंत्रिमंडळात दबदबा असेल. दुसरीकडे, अजितदादांनी आपलं अर्थ खाते आपल्याकडेच ठेवलं असून उत्पादन शुल्कही खेचून आणत स्वत:कडे ठेवलं आहे.
भाजपने संकटमोचकांचे अन् विखे पाटलांचे पंख छाटले
दरम्यान, भाजपच्या 19 मंत्र्यांमध्ये सातारचे शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी पहिल्यांदाच कॅबिनेट मिळवतानाच थेट वजनदार खाती मिळाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात आपला दबदबा आणखी भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या शिलेदारांकडे मोठी जबाबदारी दिली आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास, पंचायती राज खात्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोघांनी पहिल्यांदा कॅबिनेट मिळूनही सरकारमधील वजनदार आणि महत्त्वपूर्ण खाती मिळाली आहेत.
बावनकुळेंना लागली लाॅटरी
गिरीश महाजन यांच्याकडे भाजपचे संकटमोचक म्हणून पाहिले जाते. मात्र, त्यांच्याकडे देण्यात आलेली जबाबदारी पाहता त्यांचे पंख छाटण्यात आले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनाही दणका बसला असून तुलनेत दोघांकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा ( विदर्भ, ताप, कोकण विकास महामंडळ) आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मागील सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खाते होते. आता ते खाते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेले आहे.
मूळ भाजप नेत्यांकडे तुलनेत कमी महत्वाची खाती
भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे लक्षात न राहणारे उच्च आणि तंत्रशिक्षण खातं कायम राखण्यात आलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांना मोठं खातं दिलं जाईल, अशी आशा फोल ठरली आहे. पंकजा मुंडे यांनाही तुलनेत कमी महत्वाचे पर्यावरण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!
गृह, महसूल खाते आपल्याकडे ठेवण्यात भाजपला यश आलं असलं तरी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), गृहनिर्माण, अर्थ, नगरिवकास ही खाती शिंदे आणि अजितदादांकडे गेली आहेत. मात्र, या खात्यांमधील राज्यमंत्रीपदाची जबाबदारी फडणवीस यांच्या विश्वासू शिलेदारांकडेच आहे. नगर विकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ठेवलं आहे. मात्र, याच खात्याच्या राज्यमंत्रीपदी पुणेकर भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याकडे देण्यात आली आहे. अर्थ खाते अजितदादांकडे असले, तरी त्या खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी नागपूरकर आशिष जयस्वाल यांच्याकडे आहे. ते शिवसेनेत असले, तरी ते फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.
इतर महत्वाच्या बातम्या