सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कलेढोण गावामध्ये सर्पमित्राला सर्पदंश केल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. महेश बाबर असं त्यांचं नाव असून रुग्णवाहिका वेळेत न आल्याने मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्वतः उपचारासाठी दाखल होऊनही वेळेत उपचार न भेटल्याने मृत्यू झाला.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार विखळी येथील शिवारात शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास नाग दिसून आल्यानंतर भागातील ग्रामस्थांनी सर्पमित्र महेश बाबर यांना माहिती दिली होती. बाबर यांनी तातडीने जाऊन नागास पकडलं होतं. मात्र, पोत्यात भरत असताना आपण नागाने दंश करत बोटाला चावा घेतला. त्यानंतर त्यांनी कलेढोण कुटीर रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. त्या ठिकाणी प्रथमोपचार त्यांच्यावर करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक होत चालली होती. त्यानंतर पावणेसहाच्या सुमारास 108 नंबरवर कॉल करून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
रुग्णवाहिका तब्बल एक तासाने उशिरा आली
बाबर यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने रुग्णवाहिका बोलवण्यात आली. मात्र, रुग्णवाहिका तब्बल एक तासाने उशिरा आली. रुग्णवाहिका येत असताना खटावमध्ये रुग्णवाहिकेमध्ये बिघाड झाला. नंतर वडूजमध्ये सर्प विष प्रतिबंधित लस देणे गरजेचं असताना वडूऐवजी औंधला त्यांना न्यावं लागलं. तिथं बाबर यांना लस देऊन दुसरी रुग्णवाहिका देण्यात आली. मात्र, या कालावधीमध्ये बराच वेळ गेल्याने त्यांना साताऱ्यामध्ये नेण्यात आले. साऱ्या प्रक्रियेत उशीर झाल्याने अखेर महेश बाबर यांच्यावर मृत्यू ओढवला.
दंश ल्यानंतर बाबर यांच्यावर नर्सने पहिल्यांदा उपचार केले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे नर्सने केलेल्या उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णालयाची स्वतःची रुग्णवाहिका असतानाही दुसऱ्या रुग्णवाहिकेची वाट का पाहण्यात आली, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. रुग्णालयामध्ये एकही वैद्यकीय अधिकारी नव्हता. त्यामुळे आरोग्य विभागाच्या बेजबाबदारीपणामुळे बाबर यांचा मृत्यू झाल्याचे आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या