Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: पीएम मोदींना अमेरिकेला नाही तर मणिपूरला जाण्याची गरज आहे असे एक नेते म्हणाले, पण मी त्यांना सांगू इच्छितो की मणिपूरसाठी आमचे अमित शाह पुरेसे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी आज सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून समाचार घेतला. फडणवीस यांनी मोदी सरकारला 9 वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर लेखाजोखा मांडतानाच ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 


फडणवीस म्हणाले की, ही 9 वर्षे विकासाची आहेत. या 9 वर्षात सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल करणारे आहेत. अमेरिकेत मोदींच्या नेतृत्वात योगदिवस साजरा करण्यात आला. मूठभर लोकांच्या हितासाठी निर्णय घेतले नाहीत. यावेळी बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. आम्हाला आमच्या तिजोऱ्या भरायच्या नाहीत, आम्हला आमची घर भरायची नाहीत, तर जनतेची सेवा करायची आहे. 2024 मध्ये साताराचे खासदार आणि कराड दक्षिणचे आमदार भाजपचेच असतील, जनता अतुल भोसले यांच्या पाठीशी उभा राहतील यात शंका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही


फडणवीस म्हणाले की, ते नेते (उद्धव ठाकरे) कधी मातोश्रीवरून वरळीला जाऊ शकले नाहीत. तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही. फडणवीस यांनी मोदींनी लस दिल्याचे म्हटल्यानंतर शिवसेना वर्धापन दिनात बोलताना त्यांचा ऑडिओ ऐकवून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती. यावर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे म्हणाले मोदींनी लस तयार केली काय? मग मी म्हणतो तुम्ही सरकार चालवलं म्हणे बैलगाडीसारखं हाकत होता काय?


कोरोना काळात अन्नाविना एक मृत्यू झाला नसल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकरी सन्मान योजनेत केंद्राचे 6 आणि राज्याचे 6 असे 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. या सरकारच्या आधीच्या अडीच वर्षाच्या सरकारने एक पैसा देखील दिला नाही, आपण आता अनेक प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला. 2019 साली मी सोडून गेलेल्या योजना आहे तिथंच होत्या.  इथल्या योजना देखील माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट बघत असतील असं वाटतं. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमतीने घेतलेल्या निर्णयामुळे या भागातील साखर कारखाने सुरू राहिला, त्यामुळे आमचा ऊस उत्पादक शेतकरी वाचला. अनेक नेते म्हणत होते की मोदींना उसामधील काय कळतं? पण मोदींनी निर्णय घेऊन दाखवले आता केंद्रीय सहकार अमित शाह देखील झपाट्याने निर्णय घेत आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या