सातारा : साताऱ्यातील (Satara News) प्रस्तावित नव्या बाजार समितीच्या भूमिपूजनावरून बुधवारी साताऱ्यात जोरदार राडा झाला होता. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजेंसह (Shivendraraje Bhosale) 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गर्दी जमवणे, दमदाटी आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी तक्रार केली आहे.
भाजपचे एक खासदार आणि एक आमदार यांच्यात बुधवारी साताऱ्यात मोठा राडा पहायला मिळाला. खासदार आमदार म्हणजे छत्रपती शिवरायांचे हो दोन वंशज. या दोन्ही वंशजांमध्ये 16 एकर जमिनीचा वाद रंगताना पाहायला मिळाला. खासदार उदयनराजेंच्या नावे असलेली जमिन ही आमदार शिवेंद्रराजेंच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीच्या नावे झाली आणि बुधवारी (21 जून) शिवेंद्रराजेंनी त्या जागेत नारळ फोडताना सगळा राडा झाला. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कराडमध्ये बैठक सुरू आहे. बुधवारी बाजार समितीच्या भूमिपूजनामध्ये दोन्ही राजेंमध्ये मोठा वाद झाला. दोघांचे कार्यकर्तेही काही काळ आक्रमक झाले होते. याबद्दल आज उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहेत.
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बुधवारी समोरा समोर उभे राहून राडा झाला. अवघ्या तीन फुटांवर एकमेकांना झापाझापीचा कार्यक्रम सुरु होता. सुमारे अडीच -तीन तास हा राडा सुरु होता. पुणे - बेंगलोर महामार्गावरच्या साताऱ्याच्या हद्दीतील उदयनराजें यांच्या जमिनीवरून हा वाद झाला. या राड्यावेळी दोन्ही बाजूने आपापल्या राज्यांच्या नावाच्या घोषणा समर्थकांच्या सुरु होत्या. पोलिसांचा मोठा फौज फाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. दोन्ही गटामध्ये पोलिसांनी साखळी केल्यामुळे वाद टोकाला गेला नाही.मात्र दोन्ही राजे आक्रमक होते.
शिवेंद्रराजेंना त्या ठिकाणी भूमीपूजनाचा नारळ फोडायचा होता आणि कुदळ मारायची होती. तर उदयनराजेंना ते रोखायचे होते. शिवेंद्रराजेंनी दिलेल्या एक तास वेळेआधी उदयनराजेंनी त्या ठिकाणी जेसीबीसकट ठिय्या मांडला.बाजार समितीने उभारलेल्या ऑफिसचा त्यांनी जेसीबीने चक्काचुर केला. काही वेळातच शिवेंद्रराजे कार्यकर्त्यांसमवेत जागेत दाखल झाले. हळू हळू राडा वाढत गेला. पोलिसांनाही दोन्ही गटाने जुमानले नाही. एवढ्या राड्यातूनही शिवेंद्रराजेंनी नारळ फोडून भूमीपूजन केले.
काय आहे नेमका हा वाद ?
पुणे – बंगळूरु महामार्गावरील सातारा शहरानजिक सोळा एकर जागा आहे. या जागेवर छत्रपती शाहू फळे फुले व भाजीपाला मार्केट कमिटीचे नाव आहे. या जागेचे मूळ मालक खा उदयनराजे भोसले आहे. मात्र शिवेंद्रराजे भोसले यांचे वडिल अभियसिंहराजे भोसले हे मंत्री असताना त्यांनी या जागेवर बाजार समितीसाठी आरक्षण टाकले. तसा प्रस्ताव सादर झाला आणि त्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसेही भरले गेले. ती जागा जरी उदयनराजेंच्या नावे असली तरी त्या जागेवर अनेक वर्षापासून कुळ आहेत आणि ते आजच्या तारखेपर्यंत जमिन कसत होते. तरीही या जागेवर बाजारसमितीचे नाव लागले. चौदा वर्षापूर्वी या जागेवर बाजार समित्या नावाचा शिक्का बसला. अनेक कोर्ट कचेऱ्या झाल्या. मात्र त्यातून कोणताच निर्णय उदयनराजेंच्या बाजूने मिळाला नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ती जागा बाजारसमितीला देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोघेही एकाच पक्षातील आहे . मात्र तरीही दोघांमधील वाद हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. या दोघांच्या वादातील छोटे छोटे पैलू एक दिवसाआड सातारकर अनुभवत असताना हा पुन्हा जागेसाठीचा वादाचा अंक पहायला मिळाला या दोन्ही राजेंच्या वादाचा त्रास मात्र सातारकरांना अनेकदा सोसायला लागला आहे. या दोन्ही राजेंच्या वादाची मोठी ठिणगी ही लोकसभा विधानसभांच्या अगोदर सातारकरांना अनुभवयायला मिळत असते. त्यातीलच हा एक भाग असल्याचे अनेकांचे मत आहे. मात्र यांच्या या वादात सातारकरांचे मुलभूत प्रश्न बाजूला पडत आहेत.
संबंधित बातम्या :
साताऱ्यात बाजार समितीच्या भूमीपूजनावरून राडा, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमनेसामने