सातारा : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण देताना कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, हे राजकीय नेत्यांनी पाहावं, वाचाळविरांनी आत्मपरीक्षण करावं, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. दरम्यान अंतरवाली सराटीत लाठीचार्ज आणि दगडफेकीप्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाणार अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. राज्याचे पहिले  मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan Death Anniversary)  यांची आज पुण्यतिथी आहे.  साताऱ्यातील कराडमध्ये अजित पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतले त्यावेळी ते बोलत होते. 


अजित पवार म्हणाले, अलीकडच्या काळात महाराष्ट्रात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण त्या अधिकाराचा वापर आपण कशाप्रकारे करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे.  आज समाजात वेगवेगळे प्रश्न आहेत, पण रोज कोणीतरी काहीतरी वक्तव्य करत आहेत.  कोणी आरे म्हटलं तर दुसरा लगेच का रे म्हणतो. ही शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे सगळयांनी लक्षात ठेवावे. 


कायद्याच्या चौकटीत आरक्षण टिकले पाहिजे


आपल्या महाराष्ट्रात इतर अनेक प्रश्न आहेत, प्रत्येकाला आपल्या समाजासाठी आरक्षण मागण्याचा अधिकार आहे त्याबद्दल कोणाचे दुमत नाही. पण आरक्षण देत असताना ते कायद्याच्या चौकटीत टिकले पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही लोकांनी आरक्षण दिलं होतं, पण दुर्दैवाने ते हायकोर्टात टिकले नाही, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही, असे देखील अजित पवार म्हणाले. 


यशवंतराव चव्हाणांचे विचार आजही सर्वांसाठी मार्गदर्शक 


 उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात.  त्यांचे विचार , त्यांचे साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.


हे ही वाचा :


Deepak Kesarkar : फडणवीसांच्या निर्णयाला केसरकरांचं आव्हान?पोलीस  अधिकारी तुषार दोशींच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी