सातारा: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) ची रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर अनेक रूग्ण या आजारातून बरे होत असल्याची देखील दिलासादायक बातमी आहे. तर सातारा जिल्ह्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)चे 6 संशयित रुग्ण, 1 रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात 2, खाजगी रुग्णालयात 1, कराडच्या कृष्णा रुग्णालयात 2 अशा एकूण 5 जणांवर उपचार सुरू आहेत. पाचही रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रयोग शाळेतील वैद्यकीय तपासणी नंतर गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) चे निदान स्पष्ट होणार असल्याची माहिती देखील जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे यांनी दिली आहे.
काय आहेत लक्षणे
अचानक हाता-पायात येणारा कमकुवतपणा
अचानक चालायला, उभे राहायला त्रास होणे
आधी जास्त दिवसांचा अतिसार झालेला असणे
खाण्यास, गिळण्यास त्रास होणे
काय काळजी घ्याल?
पिण्याचे पाणी दूषित नाही याची खात्री करा
अन्न स्वच्छ व ताजे असावे
वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्या
शिळे किंवा अर्धवट शिजलेले अन्न (चिकन, मटण) खाऊ नये
ताप, उलट्या, जुलाब असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
जीबीएस रोग म्हणजे काय?
गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक बधीरपणा आणि स्नायू कमकुवत होतात, ज्याच्या लक्षणांमध्ये हातपाय गंभीर कमजोरी, अतिसार इ. डॉक्टरांच्या मते, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग सामान्यत: जीबीएसला कारणीभूत ठरतात कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित पाण्यामुळे सुरू झाल्याचा संशय आहे.
जीबीएसचे राज्यात 168 रूग्ण
गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काल( सोमवारी ता -3) 10 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, आत्तापर्यंतची रुग्णसंख्या 168 इतकी झाली आहे. यातील 86 समाविष्ट गावांतील, 32 रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील, 18 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील, 19 रुग्ण ग्रामीण हद्दीतील, तर 8 इतर जिल्ह्यांतील आहेत, जे पुण्यात उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 47 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, 47 रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. एकूण रुग्णांपैकी 21 जण व्हेंटिलेटरवर आहेत.