Sachin Kharat on Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हा बावचाळलेला माणूस आहे. त्यांना पॅंथरची व्याख्या माहित आहे का? असा सवाल करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांची बाजू घेण्याआधी गुणरत्न सदावर्ते यांनी महंतांच्या गॉगलची, जॅकेटची किंमत पाहावी, कारण त्यांना गॉगलचे चांगले नॉलेज असल्याचे खरात म्हणाले.
सदावर्ते हे असमानता पसरवणाऱ्या लोकांची बाजू घेऊन वक्तव्य करतायेत
गुणरत्न सदावर्ते हा बावचाळलेला माणूस आहे. सदावर्ते यांना पॅंथरची व्याख्या माहित आहे का?.प्राध्यापक अरुण कांबळे हे माझे कोण आहेत याचा अभ्यास गुणरत्न सदावर्ते यांनी करावा असे खरात म्हणाले. दलित चळवळीत मी जेलमध्ये गेलो असे सदावर्ते सांगतात. त्यांना माहिती नाही, सचिन खरात हे 22 वेळा तुरुंगात गेला आहे. सदावर्ते हे महाराष्ट्रामध्ये असमानता पसरवणाऱ्या लोकांची बाजू घेऊन वक्तव्य करत असतात. नुकतेच त्यांनी भगवान गडावरील महंत नामदेव शास्त्री यांची देखील बाजू घेतल्याचे सचिन खरात म्हणाले. माझा नामदेव शास्त्री यांना सवाल आहे, त्यांचा गॉगल कित्येक लाखाचा आहे, हे सदावर्ते यांना दिसत नाही का? सदावर्ते यांना गॉगलचे चांगले नॉलेज आहे असा टोला देखील खरात यांनी लगावला.
महाराष्ट्र हे संतांचे राष्ट्र
महाराष्ट्र संतांचे राष्ट्र आहे. महाराष्ट्रातील संतांनी समाजाला चांगली शिकवण दिली आहे. महंता नामदेव शास्त्री यांनी आरोपीची मानसिकता तपसायला हवी असं वक्तव्य केलं होतं, त्यांची बाजू हे सदावर्ते घेत आहेत. म्हणून ते बावचाळलेले आहेत, अशी टीका राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांनी केली.
नेमकं काय म्हणाले होते नामदेव शास्त्री?
बीड प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचे महंत श्री नामदेव शास्त्री महाराज यांनी म्हटलं आहे. यामध्ये समाजाच्या आडून मोठं राजकारण होत आहे, काही राजकीय नेते जाणीवपूर्वक या प्रकरणाच्या आडून मंत्री धनंजय मुंडे यांना बदनाम करत आहे. मात्र, यांच्या राजकारणामुळे समाजामध्ये मोठी तेढ निर्माण होत आहे याचेही भान या राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे. धनंजय मुंडे यांना आम्ही अनेक दिवसापासून ओळखतो त्यामुळे तो असं वागणार नाही असंही महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलं होतं.