एबीपी माझाच्या प्रतिनिधीने संजय राऊत यांना अजित पवारांना यापूर्वीच उपरती झाली असती तर हे सर्व टळले असते का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना राऊत यांनी `सर्व ठरल्याप्रमाणे झाले आहे', असं म्हणत एक प्रकारे दुजोराच दिला. अजित पवार यांचे बंड पूर्वनियोजित होते का? अशी विचारणा केली असता अनेक गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या आहेत, असं राऊत म्हणाले. हे शरद पवारांनी ठरवले होते का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, `मी मागेही म्हणालो होतो की शरद पवारांना समजावून घ्यायला भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील. 'दिग्दर्शक कोण होते? असे विचारले असता ते म्हणाले, `ते जॉइंट व्हेन्चर होते. ते होते, आम्ही होतो, सगळेच होते.'दिग्दर्शक - स्क्रिप्ट कोणाचे होते? असे विचारले असता `हे लवकरच कळेल.', असं उत्तर राऊत यांनी दिलं.
या सगळ्या प्रकारावर अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय यांनी 'दिलेरखानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आलं होतं...', अशा आशयाची पोस्ट जय यांनी शेअर केली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे अजित पवार यांचे बंड हे पूर्वनियोजित होते काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.
दुसरीकडे आज अजित पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी त्यांचे स्वागत सुप्रिया सुळे यांनी केले. या तीन दिवसात अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न अनेक नेत्यांनी केले होते. मात्र अजित पवार यांनी कुणाचेही न ऐकता आपल्या मतावर ठाम राहत ट्वीट करत बहुमत सिद्ध करण्याचा दावा देखील केला. या तीन दिवसात सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. आज अखेर अजित पवार शरद पवार यांच्या भेटीला त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी सुप्रिया सुळे या ठिकाणी होत्या. या घराचे दरवाजे अजित पवारांसाठी उघडे होते.