2 दिवसात 6 कोटी लिटर पाणी साठवलं, सांगोल्यातील शेतकऱ्याची शक्कल
एबीपी माझा वेब टीम | 11 Jan 2017 11:27 AM (IST)
सोलापूर : सांगोला तालुक्याला देवधर धरणाचे पाणी मिळण्यासाठी अनेकजण सरकार दरबारी आणि न्यायालयात लढा देत आहेत, 2008 पासून सिंचन अधिकृतरित्या सुरु झाले आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी वाटप संस्थांची नोंदणी करून पाणी मिळविले. मात्र केवळ 2 दिवसाच्या रोटेशन मध्ये पाणी साठवायचं कसं हा मोठा प्रश्न होता. त्यावर उपाय शोधला अनिरुद्ध पुजारी यांनी. दोन दिवसात त्यांनी 6 कोटी लिटर पाणी साठवून दाखवलं आहे. सांगोल्याचे अनिरुद्ध पुजारी हे गेली अनेक वर्षे पाण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत होते, त्यांच्या लढाईला यश आलं. देवधर धरणाचे पाणी त्यांनी मिळवलं खरं मात्र पाण्याची पाळी केवळ दोन दिवसच मिळणार असल्याने हे पाणी अडवायचं कसं हा यक्षप्रश्न पुजारी यांच्यासमोर होता. यावरही त्यांनी मात केली आणि कोणतीही यंत्रसामुग्रीचा वापर न करता, फक्त दोन दिवसात तळ्यात 6 कोटी लिटर पाणी साठवलं. पुजारी यांच्या पाणी वाटप संस्थेतील 270 शेतकऱ्यांनी थेट शेतीला पाणी दिले, तर काहींनी विहिरीत पाणी सोडलं. पुजारी यांनी मात्र नैसर्गिक उतारावरील जमीन निवडून 115 मीटर लांबीचे शेततळे आणि 414 मीटर लांबीचा मोठा कालवा बनवून घेतला. तळं बनवताना खोदलेली माती काढून त्याचे 8 मीटर खोल तळं बनवले. तळ्यात आणि कालव्यात कागद टाकून पाणी साठवण्याची व्यवस्था केली. देवधर धरणाचे पाणी येताच नैसर्गिक उताराने हे पाणी थेट पुजारी यांनी बनवलेल्या कालव्यातून तळ्यात जमा झाले. यामुळे सध्या 2 एकर क्षेत्राच्या तळ्यात साडेतीन कोटी लिटर आणि दीड एकर मोठ्या कालव्यात अडीच कोटी लिटर पाणी साठले. हे शेततळे बनविताना पुजारी कुटुंबाला कागदासाठी 23 लाख आणि खोदाईसाठी 9 लाख रुपये खर्च आला. पण आता पुजारी यांच्या 50 एकर शेतीला ठिबकच्या साहाय्याने 150 दिवस हे पाणी पुरणार आहे. यात 15 एकर शेवगा , 25 एकर डाळिंब , 15 एकर द्राक्षे, कलिंगडे आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात लावला आहे. त्यातून मिळणारा फायदा मोठा आणि दीर्घकालीन असेल, असा विश्वास अनिरुद्ध पुजारी यांना आहे. पिढ्यानपिढ्या दुष्काळाची सवय झालेले शेतकरी पाणी मिळण्याची शक्यता दिसताच ते अडवण्यासाठी सर्व ते प्रयत्न करतात. यात अशक्यप्राय वाटणाऱ्या अडचणीतून देखील ते कसा मार्ग काढतात याचंच उदाहरण अनिरुद्ध पुजारी यांनी दाखवून दिलं आहे. पाहा व्हिडीओ