Sangli News: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांच्या शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या इस्लामपूर शहरामध्ये उद्या (16 ऑगस्ट) हा कार्यक्रम होणार आहे. इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा व प्रारंभोत्सव कार्यक्रम या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कट्टर विरोधक उद्या इस्लामपूरमध्ये एका व्यासपीठावर
सरोज पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना रितसर निमंत्रित केले आहे. आता यामध्ये कोण कोण नेते या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित राहतात आणि उपस्थित नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगणार का? याकडे लक्ष लागून राहिलं आहे. उद्या सांगली जिल्ह्यात अजित पवार यांचा अधिकृत दौरा आहे त्यामुळे अजित पवार तर सकाळच्या सत्रात असलेला इस्लामपूरमधील या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे निश्चित आहे. दुसरीकडे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील या कार्यक्रमास उपस्थित राहू शकतात. आता हे दोन नेते उपस्थित राहणार असल्याने जयंत पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये हा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला जयंत पाटील देखील उपस्थित राहणार हे निश्चित मानले जाते. रोहित पवार जर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या व्यासपीठावर आले तर सध्याचे राजकीय परिस्थितीतील कट्टर विरोधक उद्या इस्लामपूरमध्ये एका व्यासपीठावर आलेले पाहायला मिळतील.
जयंत पाटलांना घेरण्याची तयारी
राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यापासून अजित पवार गटाकडून सातत्याने जयंत पाटलांना बालेकिल्ल्यामध्येच घेरण्याचा प्रयत्न झाला आहे. सांगली जिल्ह्याचे पालकत्व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी भाजपत घरवापसी केली आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीतही जयंत पाटलांना घेरण्याचा प्रयत्न झाला होता. शहराच्या नामांतरावरूनही जयंत पाटलांवर सातत्याने केली जात आहे. त्यामुळे राजकीय प्रतिस्पर्धी एकत्र आल्यास चांगलीच जुगलंबदी रंगणार यात शंका नाही.
इतर महत्वाच्या बातम्या