सांगली : लोकसभेमध्ये राज्यभर गाजलेला सांगली पॅटर्न आता विधानसभेतही कायम राहिल्याचं दिसून येतंय. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या वसंतदादा गटाने जयश्री पाटील यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्याला आता खासदार विशाल पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला.वसंतदादा कुटुंबात 2014 नंतर तिकीट मिळालं नाही, आमची काय चूक झाली असा सवाल विशाल पाटील यांनी विचारला. त्यामुळेच आता जयश्री पाटील यांना निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. 


Who Is Jayshree Patil Sangli : कोण आहेत जयश्री पाटील? 


जयश्री मदन पाटील या खासदार विशाल पाटील यांच्या चुलत वहिनी आहेत. 2016 मध्ये मदन पाटील यांच्या निधनानंतर मदन पाटील गटाची सूत्रे जयश्री पाटील यांनी हातात घेतली. सध्या जयश्री पाटील या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आहेत. 


जयश्री पाटील यांचं माहेर हे ठाणे जिल्ह्यातील  कल्याण मध्ये आहे. खासदार विशाल पाटील यांच्या प्रचारात उघडपणे जयश्री पाटलांनी सहभाग घेतला होता. त्या प्रचाराच्या माध्यमातूनच जयश्री पाटील यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीची पेरणी सांगली विधानसभा मतदारसंघात केली होती.


वसंतदादा घराण्यामध्ये तिकीट मिळावी अशी इच्छा


खासदार विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील हे दोन वेळा सांगलीचे खासदार राहिलेले आहेत. दुसऱ्या वेळी प्रतीक पाटील यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देखील मिळालं होतं. खासदार विशाल पाटील आणि जयश्री पाटील या एकाच वसंतदादा कुटुंबातील असल्याने काँग्रेसचे सांगली विधानसभेचे तिकीट वसंतदादा घराण्यातच मिळावं अशी या गटाची इच्छा होती. मात्र मूळचे मिरजेचे असेलेले आणि काँग्रेसचे नेते राहिलेले खासदार गुलाबराव पाटील यांचा वारसा असणारे त्याचे चिरंजीव आणि सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना हे तिकीट पक्षांने दिले. त्यामुळे वसंतदादा कुटुंब नाराज झाले. 


दुसरीकडे पृथ्वीराज पाटील यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांचे उघडपणे काम केले नव्हते. त्यावरून विशाल पाटील गटामध्ये नाराजी होती. त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांना विधानसभेत तिकीट मिळावे यासाठी विशाल पाटील यांनी प्रयत्न केले नाहीत. 


सांगलीतील निवडणुकांमध्ये वसंतदादा घराण्याचा दबदबा


सांगली विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 16 निवडणुका काँग्रेसने जिंकले आहेत. त्यापैकी पाच निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने जिंकल्या. 1980 मध्ये वसंतदादा पाटील यांनी स्वतः इंदिरा गांधी यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवली होती. त्यानंतर सलग दहा निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील सदस्यांनी लढवल्या आणि जिंकल्या. वसंतदादा पाटील यांच्याबरोबर शालिनीताई पाटील, प्रकाश बापू पाटील, मदन पाटील, प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांनी आतापर्यंत लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत.


विशाल पाटील अपक्ष निवडून आले


प्रतीक पाटील यांचा 2009 मध्ये विजय झाल्यावर त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. मात्र 2014 च्या निवडणुकीत प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 मध्ये विशाल पाटील यांना लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवारी मिळाली नाही. सांगलीची जागा शेतकरी संघटनेला सोडण्यात आली. 2019 ची लोकसभा विशाल पाटील लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीतून  काँग्रेसला जागा मिळाली नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी बंड केले करून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले. 


ही बातमी वाचा: