इस्लामपूर: एका कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पाटील देखील एकाच व्यासपीठावरती आले आहेत, यावेळी अजित पवारांच्या समोर बोलताना जयंत पाटील यांनी हा जिल्हा झुकणार नाही, भूमिका बदलणार नाही, हेच वाळवा तालुक्याचे वैशिष्ट्य आहे, सहजा सहजी वाकत नाही, घाबरून जात नाही. कितीही फंदफितुरी झाली तरी इथली माणसं स्वाभिमानाने राहतात, असं म्हणत एक प्रकारे टोला लगावल्याची चर्चा आहे. एन.डी.पाटील साहेबांनी देखील कधी विचार सोडला नाही. त्यांनी त्यांचे विचार आणि भूमिका कधीही बदलल्या नाहीत, सत्ता इकडून तिकडून गेली, तरी उडी मारल्याचं ऐकलंय का तुम्ही, या माणसाचं महत्व त्यातच आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

मला वाटतं हा तालुका एन. डी. पाटलांची जी प्रवृत्ती होती, जी पर्सनॅलिटी होती, ती वाळवा तालुक्याची एकंदर स्वभाव काय आहे हीच सांगणारी होती. मी दोन्ही दादांना सांगू इच्छितो हा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे, या तालुक्याला फार मोठी स्वातंत्र्यसैनिकांची परंपरा आहे. क्रांतिसिंह नाना पाटील याच तालुक्यातले आहेत, नागनाथ नाईकवडे याच तालुक्यातील आहेत, बाबूजी पाटणकर देखील याच तालुक्याचे आहेत, अशी असंख्य यादी मोठी आहे. ज्यांनी संघर्ष करताना कधीही माघार घेतली नाही. या वाळवा तालुक्याचे हेच सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे, कदाचित भारतातील सगळ्या तालुक्यांपेक्षा जास्त वाळवा तालुका वेगळा आहे असा मी मानतो, तुम्हाला असा तालुका सापडणार नाही, ज्याच्यात लढवय्ये प्रवृत्ती आहे. लढण्याची मानसिकता आहे. लढाई करायची असेल तर ती शेवटपर्यंत निकराने करायची हे आयुष्याच्या शेवटपर्यंत एन. डी. पाटील सरांनी दाखवून दिलं, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

हा आमच्या तालुक्याचा प्रॉब्लेम देखील

पुढे पाटील म्हणाले, वाळवा तालुक्याचा आदर्श आहे, म्हणूनच हा आमच्या तालुक्याचा प्रॉब्लेम देखील आहे. सहजासहजी वाकत नाहीत सहजासहजी शरण जात नाहीत. लढाई करायची असेल तर ती करत असताना कितीही फंदफितुरी झाले तरी जे आहे, त्यांच्याबरोबर लढणार हे एन डी पाटलांपासून सगळ्यांचं स्वतंत्र सैनिकांनी आम्हाला शिकवले आहे. हा आमचा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचं वाळवा तालुक्याच्या स्वाभिमानाचा केंद्र आहे आणि म्हणून हा तालुका निश्चितपणाने आज कायद्याचं राज्य म्हणून जे आपण देशात म्हणतो, त्या कायद्याच्या राज्यात आमच्या तालुक्यातील मुलं जास्तीत जास्त शिकावी आणि कायदा शिकणारी आमची मुलं कोर्टात हायकोर्टात, सुप्रीमकोर्टात जावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो असेही जयंत पाटील यांनी पुढे म्हटलं आहे.