सांगली : आम्ही सांगली काँग्रेसची जागा मिळावी यासाठी प्रयत्नशील होतो. यासाठी लोकांच्या भावना दिल्लीपर्यंत भावना पोहोचवल्या आहेत. राज्यातील नेत्यांसोबतही बैठका झाल्या. उद्धव ठाकरे ज्यापद्धतीने लढत आहेत ते पाहता ठाकरेंबाबत व्यक्तीश: आम्हाला आदर आहे. तथापि, सांगलीची भावना समजून घ्यायला हवी होती त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. आम्ही काँग्रेस पक्षाकडे आणि महाविकास आघाडीकडे जागेची मागणी करत असल्याचे काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात काँग्रेसकडून शाहू महाराज लढणार जाहीर होताच अचानक उद्धव ठाकरे यांनी सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याचे विश्वजित कदम म्हणाले. 


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विश्वजित कदम सांगलीच्या जागेवरून नाराज असल्याची चर्चा होती. तसेच आज विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यात जाऊन भेट घेतली. यामुळे दबावतंत्राचा भाग असल्याचे बोलले जात आहे. मात्र, विश्वजित कदम यांनी सुरुवातीलाच पत्रकार परिषदेत कोणतेही प्रश्न स्वीकारले जाणार नाही असे सांगत या भेटीवर भाष्य केले नाही. तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगत पर्याय खुला ठेवला आहे का? अशीही चर्चा आहे. 


कोल्हापूर सोडल्यानंतर सांगलीच्या जागेवर दावा


विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेसाठी गेल्या 15 दिवसांपासून भेटीगाठी कोणासोबत झाल्या, याची माहिती दिली. ते म्हणाले की,  प्रदेश काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाणांशी सांगलीच्या जागेवरून बैठका झाल्या. दिल्लीमध्येही  पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेन्नीथला यांच्याशी बैठक झाली. या बैठकीमध्ये सांगलीची जागा काँग्रेससाठी मागितली. ते पुढे म्हणाले की, या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार गटाच्या सुमनताई पाटील आमदार आहेत. तसेच स्थानिक स्वराज्यसंस्था आणि ग्रामपंचयतीमध्ये ताकद आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसची जागा सोडण्यात आली. यानंतर सांगलीच्या जागेवर ठाकरेंकडून दावा करण्यात आला. यानंतर 21 तारखेला सांगलीत उमेदवारी जाहीर केल्याचे विश्वजित कदम म्हणाले. 


आमच्या नेत्यांनी हा निर्णय एकतर्फी घेतला 


त्यांनी सांगितले की, मविआचे जागावाटप जाहीर करण्यात आले. मात्र, सांगलीची परिस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन करत आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती मविआ नेत्यांना करत असल्याचे ते म्हणाले. ही सांगली कार्यकर्त्यांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीसह काँग्रेसने निर्णय घ्यावा. आम्हाला हा निर्णय पचनी पडलेला नाही. यासंदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत. सांगलीसाठी सकारात्मक निर्णयाची वाट पाहणार आहोत, 'मविआ'ने पुनर्विचार करावा असेही त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या