सांगली : उरुसातील बैलगाडा पळवण्याच्या कार्यक्रमात चाकाखाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल. रोहन राजेंद्र घोरपडे (वय 23, रा. लेंगरे ता. खानापूर जि. सांगली) ही घटना काल शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाळूज (ता. खानापूर) येथे घडली. याप्रकरणी विट्यातील डॉ. भरत देवकर यांनी विटा पोलिसांत वर्दी दिली आहे.
बैलगाडा पळत असताना थेट बघणाऱ्या माणसांच्या गर्दीत घुसला
मिळालेल्या माहितीनुसार सध्या यात्रा जत्रा आणि उरुसाचे दिवस आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील वाळूजमध्ये पिराचा उरूस सुरू आहे. काल शनिवारी पिराच्या खडी याठिकाणी बैलगाडे पळवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. पारंपारिक प्रथेनुसार सायंकाळी बैलगाडी पळवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र, यातीलच एक बैलगाडा पळत असताना थेट बघणाऱ्या माणसांच्या गर्दीत घुसला. या धावपळीत रोहन घोरपडेच्या अंगावरून बैलगाड्याचे चाक गेले.
चाक अंगावरून गेल्याने रोहन गंभीर जखमी
उरुसासाठी बनवण्यात आलेल्या या बैलगाड्याचे चाक मोठे आणि वजनदार असते. हे चाक अंगावरून गेल्याने रोहन गंभीर जखमी झाला. त्याच्या सोबत असणाऱ्या जगदीश अर्जुन मोरे याने त्याला तातडीने विट्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाची पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
रोहन हा अतिशय हरहुन्नरी आणि मनमिळाऊ स्वभावाचा होता. लहानपणी वडीलांच्या मृत्यूनंतर तो आजोळी लेंगरे येथे रहात होता. आई, आजोबा, मामांनी अतिशय कष्टाने आणि प्रेमाने त्याला वाढवले. नुकताच तो पुणे येथे नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाला होता. लेंगरे गावच्या यात्रेसाठी नुकताच तो गावी आला होता. मात्र लेंगरे गावाजवळील वाळूज गावच्या उरुसातील बैलगाडे पाहण्यासाठी तो मित्रांसोबत गेला होता. मात्र तेथेच त्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या