Sangli Crime : इस्लामपूरमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट दस्त तयार करून जमिनीची परस्पर विक्री आणि व्यवहार केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात मंडल अधिकाऱ्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दस्त करून परस्पर 12 गुंठ्यांचा प्लॉट विकून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी मंडल अधिकारी, राजकीय नेता, स्टँप व्हेंडर व तलाठ्यासह 10 जणांवर हा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गैरव्यवहारातील मध्यस्थी निलेश संपत बडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विजय पाखरे यांची इस्लामपुरात कोरे क्रशर रोडवर शेतजमीन आहे. पाखरे यांना कौटुंबिक अडचण आणि मुलाच्या शिक्षणासाठी पैशाची गरज असल्याने त्यांनी त्यांच्या वहिवाटेची जमीन विक्रीस काढली होती. पाखरे यांचा भाऊ निलेश बडेकर यांच्या मदतीने विजय जाधव हे जागा पाहण्यासाठी आले. या जमिनीचा व्यवहार ठरला आणि व्यवहार ठरल्याप्रमाणे सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्या प्रशासकीय इमारतीतील कार्यालयात दस्त झाला होता. नंतर मात्र, पाखरे यांच्या माघारी परस्पर खरेदी दस्तांमधील मजकूर बदलण्यात आला.
त्यामध्ये बनावटपणा करून सातबारा उताऱ्यावर विजय जाधव यांनी स्वतःच्या नावाची नोंद केली. नंतर काही दिवसांनी याच जागेची दस्त जाधव यांनी ढगेवाडी येथील चार जणांना खरेदी दस्त दिलेला आढळला. त्यावर दुसऱ्याच चार जणांची नावे आहेत. त्यामध्ये दोघांनी त्या जागेवर बांधकाम केले आहे.
तक्रारदार पाखरे यांच्याकडून सर्वेमधील खरेदी घेणारे विजय जाधव यांनी त्यामध्ये बनवागिरी करून उपविभागीय अधिकारी वाळवा यांचे आदेशात खोटे व बनावटीचे कागदपत्र दाखल केल्याचे पुढे आले. हा खरेदी दस्त गाव कामगार तलाठी यांनी पाखरे यांना कोणत्याही पूर्व सूचना न देता नोंद केली. जाधवने बनावट खरेदी दस्तावरून स्वतःच्या फायद्यासाठी ही जागा 25 लाख रुपयांनी 18 मे 2022 ला निबंधक वाळवा यांच्याकडे दस्त करून सुजित दिलीप थोराला दिली.
त्यामुळे 10 जणांनी मिळून जमीन हडप करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पाखरे यांनी इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये केली आहे. इस्लामपूर पोलिसांनी मंडल अधिकाऱ्यांसह 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या