Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याच्या हद्दीत दोन हरणांचा मृत्यू झाला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात या हरणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अभयारण्यामध्ये एका हरिणाचा तर अभयारण्याबाहेर आणखी एका हरणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सागरेश्वर अभयारण्यात हरणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.


अभयारण्याचे कुंपन अभयारण्याच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या तळ्यात तुटलेले आहे. दोनशे ते तीनशे फुट सलग कुंपन तुटलेलं असल्याने यामधून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात चाऱ्याच्या शोधात बाहेर पडत आहेत. तुटलेल्या कुंपनातून मोकाट कुत्रीही अभयारण्यात प्रवेश करत आहेत. यामुळे अनेक हरणे मोकाट कुत्र्यांना बळी पडत आहेत. अभयारण्याच्या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर हरिण मृत्यूमुखी पडले असतानाही याबाबत अभयारण्य प्रशासन अथवा प्रादेशिक वनविभागाला याची पुसटशीही कल्पना नव्हती.


वाळवा तालुक्यात दोन बिबट्यांचा मृत्यू


सागरेश्वर अभयारण्याच्या हद्दीत दोन हरणांचा मृत्यूची घटना ताजी असतानाच सांगली जिल्ह्यात दोन नर जातीच्या बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. वाळवा तालुक्यातील कार्वे आणि इटकरे या दोन गावात बिबट्यांचा मृत्यू झाला. यामध्ये एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात असून दुसऱ्या बिबटयाच्या मृत्यूचे कारण  मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकाच वेळी दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने वन्य प्राण्यांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ही घटना 17 डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. 


वाळवा तालुक्यातील इटकरेमधील रवींद्र रघुनाथ पाटील यांच्या शेतात सडलेल्या अवस्थेतील बिबट्याचा मृतदेह आढळला होता. या घटनेत बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरीकडे वाळवा तालुक्यातील कार्वे येथील हणमंत महादेव माळी यांच्या शेतातील विहिरीत अंदाजे सहा महिने वयाचा बिबट्या पडला. विहिरीतील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या