Sangli Crime : सांगलीच्या इस्लामपूर येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार दिनकर शिंदे यांच्यावर लोखंडी गजाने हल्‍ला केल्याप्रकरणी तिघा संशयितांना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचा तालुकाप्रमुख (शिंदे गट) सागर मलगुंडे याच्यासह त्याच्या सहा साथीदारांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गटात या म्हणून हल्ला केल्याचा आरोप नगरसेविका प्रतिभा शिंदे आणि त्याचे पती शिवकुमार दिनकर शिंदे यांनी केला होता. 


शिवकुमार हे सोमवारी सकाळी दूध घेवून मोटारसायकलवरून घरी निघाले होते. रस्त्यादरम्यान संशयित मलगुंडे व त्याचे साथीदार दबा धरून बसले होते. त्यांनी शिवकुमार यांची मोटारसायकल अडविली. लोखंडी रॉडने त्यांच्या हातावर, पायावर, पाठीत मारहाण केली. या मारहाणीत शिवकुमार यांच्या पायाला, हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मंगळवारी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.


शिवकुमार शिंदे हे शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती आहेत. प्रभाग 4 मधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार (शिंदे गट) व प्रतिभा शिंदे या निवडून आल्या होत्या. सभागृहाचा कार्यकाल संपत आल्यानंतर शहराचे ईश्वरपूर असे नामकरण करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. या नामांतराचा ठराव घेण्यासाठी बोलविण्यात आलेल्या पालिकेच्या सभेस नगरसेविका शिंदे या गैरहजर होत्या. तेव्हापासून त्यांचे शिवसेशी बिनसल्याची चर्चा होती. प्रतिभा शिंदे या सेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारीही आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या