Sikandar Shaikh : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील कुरळपमध्ये हनुमान यात्रेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे मैदान भरवण्यात आले होते. भर पावसात तीन मिनिटे चाललेल्या थरारक कुस्तीमध्ये  महान भारत केसरी सिकंदर शेखने  दुहेरी पट काढत एक चाक डाव काढून इराणचा मल्ल अली मेहरीला चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला. विजेत्या सिकंदर शेखला यावेळी चार लाखांचं रोख बक्षीस, बुलेट गाडी आणि हनुमान केसरी किताब देऊन गौरवण्यात आले. पाऊस सुरु असताना देखील कुस्ती प्रेमींनी मैदानातील हजेरी कायम ठेवली. पावसामध्ये भिजतच या कुस्तीचा प्रेक्षकांनी आनंद लुटला. कुस्ती स्पर्धेदरम्यान वादळी वारा आणि पावसाने हजेरी लावली. शेवटी भर पावसातच एक नंबरची कुस्ती पार पडली.


पैलवान अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुरळप ग्रामस्थांच्या वतीने हनुमान यात्रेच्या निमित्ताने जंगी कुस्ती मैदान पार पडले. ज्यामध्ये सुमारे 100 हून अधिक छोट्या-मोठ्या कुस्त्या पार पडल्या. चार लाख रुपये आणि बुलेट गाडीसाठी महान भारत केसरी पैलवान सिंकदर शेख आणि इराणच्या आंतरराष्ट्रीय विजेता अली मेहरी यांच्यात लढत झाली. 


कुस्त्यांचे मैदान सुरु असताना पाऊसाने हजेरी लावली आणि पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान अली मेहेरी यांच्यामध्ये देखील भर पावसात लढत झाली. विजांच्या कडकडाटासह भर पावसात तीन मिनिटे चाललेल्या थरारक कुस्तीमध्ये पैलवान सिकंदर शेखने दुहेरी पट काढत एक चाक डाव काढून इराणचा मल्ल अली मेहरीला चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला आहे. भर पावसात रंगलेल्या या कुस्ती स्पर्धा पाहून कुस्ती शौकण्यांचे डोळ्याचे पारणे फिटले.


सिकंदरची सांगलीच्या मातीत दमदार कामगिरी 


महाराष्ट्र केसरीनंतर झालेल्या विविध स्पर्धांमध्ये सिकंदरने सलग मैदान मारले आहे. सांगलीमध्ये त्याने वर्षात तिसऱ्यांदा गदा उचलली आहे. फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांगलीत कृष्णा काठावर पार पडलेल्या कुस्ती मैदानातही सिकंदर शेखने अवघ्या एक मिनिटात मैदान मारताना गोपी पंजाबला अस्मान दाखवले होते. रोमहर्षक कुस्तीमध्ये पैलवान सिकंदर शेखने पंजाबाच्या भारत केसरी गोपी पंजाबला चितपट केले. यामध्ये पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा पैलवान गुरुप्रीत सिंह उर्फ गोपी पंजाब यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती पार पडली. ज्यामध्ये एकचाक डावावर सिकंदर शेखने गोपी पंजाबला अस्मान दाखवत छत्रपती शिवाजी महाराज चषक पटकावला होता. 


तत्पूर्वी, 'भीमा केसरी' स्पर्धेत सिकंदर शेखने पंजाबच्या भूपेंद्रसिंहला अस्मान दाखवलं होतं. महाराष्ट्र केसरीप्रमाणे आयोजित केलेल्या या भीमा केसरी स्पर्धेकडे सिकंदर आणि महेंद्रच्या उपस्थितीमुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. तत्पूर्वी, सिंकदरने सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील 'विसापूर केसरी'चे मैदान मारलं होतं. त्यावेळी सिकंदरने मोळी डावावर पंजाबचा पैलवान नवजीत सिंहला लोळवले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या