Shahaji Bapu Patil on Ajit Pawar : भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेल्या पोस्टर्सवरून सांगोलाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना (Shahaji Bapu Patil on Ajit Pawar) अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ते आज (23 जुलै) सांगलीत (Sangli News) फॅबटेक मल्टीस्टेट सोसायटीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. राष्ट्रवादीमधील फुटीर अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वाढदिनी शुभेच्छा देताना केलेल्या ट्विटनंतर राजकीय भूवया उंचावल्या आहेत. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच असे ट्विट केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चा रंगल्या आहेत.
सरकारला कसलाही धोका नाही
आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की, भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांची महत्त्वकांक्षा असते. मात्र, सध्याचे शिंदे यांचं नेतृत्व भक्कम आहे आणि सर्वांना न्याय देणारं आहे. त्यामुळे येणारी 2024 ची निवडणूक महायुती मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात लढवेल आणि विजयी होईल. आमच्या सरकारकडे मोठे बहुमत असल्याने सरकारला कसलाही धोका नसल्याचे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले. अजित पवारांनी आमदारांना केलेल्या निधी वाटपाचे स्वागत करत सर्व आमदार समाधानी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण आणि शहरी निधीमध्ये फरक असतो
जयंत पाटील आणि आव्हाड यांना निधी दिला नाही, यावर बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण आणि शहरी निधीमध्ये फरक असतो. त्यामुळे भविष्यात नगरविकास मधून निधी मिळेल. मात्र, मी तरी निधीवरून समाधानी आहे. राज्यात एकीकडे पावसाचा हाहाकार आहे. मात्र, सांगोला तालुक्यात पावसाची ओढ असल्याने येथील शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी शहाजी बापू पाटील यांनी केली.
भाजप सेनेच्या विचारला भारावून वेगळी वाट पकडली
शहाजी बापू पाटील म्हणाले की, मी सांगलीत असताना काँग्रेसमध्ये राहून युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम केले. मात्र, कालांतराने भाजप शिवसेना यांच्या विचाराने भारावून गेल्याने मी वेगळी वाट पकडली अशी कबुलीही त्यांनी दिली. महायुतीत दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात जास्त कामे माझ्या मतदारसंघात झाल्याचा दावाही शहाजी बापू पाटील यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या