सांगली: तासगाव भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी शिवसेनेचे तासगाव तालुकाप्रमुख प्रदीप माने यांच्यासह अन्य सहा जणांवर सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या (Sangli) तासगावमधील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराबद्दल संताप व्यक्त करत शिवसेनेचे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी शुक्रवारी (18 ऑगस्ट) मुख्यालय सहायक चंद्रकांत शिरढोणे यांच्यासह तिघांना कानशिलात लगावली होती. याप्रकरणी शनिवारी शिरढोणे यांनी प्रदीप माने, विशाल भोसले, सुनील घेवारे यांच्यासह अनोळखी तिघांविरोधात तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान प्रदीप माने यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला असून या निषेधार्थ आज माने यांचं गाव, म्हणजेच सावर्डे गाव बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे.


शासकीय कार्यालयाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


शिवसेनेचे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी शुक्रवारी मुख्यालय सहायक चंद्रकांत शिरढोणे यांना शिवीगाळ करून त्यांच्यासह दत्ता जगताप, बाळासो लोखंडे यांच्या कानाखाली लगावली. विशाल भोसले यांनी शिवीगाळ केली. कार्यालयातील खुर्ची उचलून मोडतोड केली. शासकीय कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन करून शासकीय कामात अडथळा आणला. शासकीय साहित्याची तोडफोड केली. यासह अन्य कारणांचा उल्लेख करून शिरढोणे यांनी प्रदीप माने यांच्यासह सहा जणांवर तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार तालुकाप्रमुख माने यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विशाल भोसले यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून कार्यालयातील खुर्चीची देखील मोडतोड केली. महिला कर्मचारी प्रियांका बापूसाहेब देसाई यांना, 'फुकटचा पगार घेता काय?' अशी विचारणा करून शिवीगाळ केली. तसेच घटनेचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण करून ते प्रसारमाध्यमांद्वारे आणि सोशल मीडियातून 'व्हायरल' करून शासकीय कार्यालयाची बदनामी केली आहे, अशी फिर्याद देण्यात आली आहे.


इशारा देऊनही सुधारणा नाही


प्रदीप माने यांच्यासह सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तासगावमधील कार्यालयास अचानक भेट दिली होती. त्यावेळी कार्यालयातील 70 टक्के खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. कोण कुठं गेलं आहे, याची कोणालाच कल्पना नव्हती. लोक मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाट पाहत उभे होते. त्यांना कोणीही व्यवस्थित माहिती देत नव्हते. या कार्यालयाचे प्रमुख वाय. सी. कांबळे हेही गैरहजर होते. हा प्रकार पाहून माने चांगलेच संतापले होते. या कार्यालयाच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.


सविस्तर वाचा:


Sangli : सरकारी दस्तावेज बोगस लोकांच्या हातात, ठाकरे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुखाने 'भूमी अभिलेख कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात