Sangli News : सध्या उठसूठ शहर बंदची (Bandh) हाक देण्याचे प्रमाण सर्वत्र वाढले आहे. एखादी अप्रिय घटना असो किंवा वादग्रस्त बाब असो किंवा अन्य काही घटना घडल्या की लगेच एखाद्या संघटनेकडून मग शहर बंदची हाक दिली जाते. या सततच्या बंदला कंटाळूनच सांगली (Sangli) जिल्ह्यातील इस्लामपूर (Islampur) शहरातील व्यापारी महासंघाने एक निर्णय घेतलाय ज्याची सध्या चर्चा होत आहे. तो निर्णय म्हणजे इस्लामपूरमधील व्यापारी महासंघ यापुढे शहरात कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा किंवा कुणाचाही कोणत्याही विषयावरुन बंद असला तरी व्यापारी त्या बंदमध्ये फक्त दुपारी 12 वाजेपर्यंतच सहभागी होतील, 12 नंतर मात्र व्यापारी आपापले व्यवसाय सुरु करतील. या निर्णयाबाबतच्या आशयाचे फलक ही इस्लामपूर शहरात व्यापारी महासंघाच्या वतीने लावण्यात आले आहेत. 


निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या संघटनेवर कारवाई : इस्लामपूर व्यापारी महासंघ 


शहर बंदची हाक देण्यावरुन सतत बाजारपेठा बंद करण्याची वेळ येत असल्याने  एखाद्या शहरातील व्यापारी संघटनेने असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्यापारी संघाने लावलेल्या फलकावर लिहिले आहे की इस्लामपूर व्यापारी महासंघ (Islampur Trade Federation) कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही संघटनांचा बंद असल्यास दुपारी 12 वाजेपर्यंत बंद पाळून पाठिंबा दिला जाईल. त्यानंतर सर्व दुकाने उघडली जातील. व्यापारी महासंघाच्या निर्णयाचा कोणतीही संघटना अथवा पक्षाने उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. 


व्यापाऱ्यांना वेठीस धरलं जात असल्यामुळे निर्णय


कोणत्या ना कोणत्या कारणावरुन प्रत्येक शहरात बंदची हाक दिली जाते. यावेळी व्यापाऱ्यांना वेठीस धरलं जातं. आपला बंद यशस्वी झाला आहे हे दाखवण्यासाठी आंदोलक व्यापाऱ्यांना जबदस्तीने दुकांन बंद करायला लावतात. यामुळे इस्लामपूरमधल्या व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे की कोणत्याही संघटनेचा, पक्षाचा बंद असेल तर आम्ही पाठिंबा देऊ, मात्र दुपारी बारा वाजेपर्यंतच बंदमध्ये सहभागी होऊ. या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सांगलीतील व्यापाऱ्यांनी या निर्णयाचं कौतुक केलं आहे. मात्र इस्लामपूरमधील व्यापारी महासंघाची संख्या मर्यादित आहे. हा निर्णय सांगली शहरात आणि जिल्ह्यात राबवावा लागला तर सगळ्या व्यापारी संघटनांचा एकत्रित विचार करावा लागेल. वेळ आलीच तर राज्यस्तरावर व्यापारी महासंघाची बैठक होईल तिथेही हा निर्णय मांडू असं महासंघाचं म्हणणं आहे.


VIDEO : Sangli Islampur : कोणाचाही बंद असो, 12 वाजेपर्यंतच दुकानं बंद ठेवणार; व्यापारी महासंघाचा निर्णय