Sangli News : सांगली जिल्ह्यातील दुष्काळाच्या शिक्का असलेल्या करजगी (ता. जत) येथील सदाशिव शिवशंकर मेडीदार या तरुणाने नुकत्याच झालेल्या आयबीपीएस परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावत गुणवत्ता अधोरेखित केली आहे. बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाची परीक्षा रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखाली घेतली जाते. त्यामुळे या परीक्षेस विशेष महत्त्व आहे. सदाशिव मेडीदारची नुकत्याच झालेल्या परीक्षेत इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (बँकिंग कर्मचारी निवड संस्था) आयबीपीएस अॅग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर या पदावर निवड झाली. विशेष म्हणजे, सदाशिवला भारतातील टॉपर बनण्याचा मान देखील मिळाला आहे.
घरातून ऑनलाईन अभ्यास
सदाशिवने राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेत 76.27 टक्के गुण मिळवत राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्येच प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. सदाशिवचे माध्यमिक शिक्षण करजगीच्या परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्याने महात्मा विद्यामंदिर हायस्कूल आणि जुनिअर कॉलेज उमदी येथे शिक्षण घेतले. त्यानंतर कृषी पदविकेचे शिक्षण लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय हिंगणगाव कडेगावमध्ये पूर्ण केले. सदाशिवला उमदी समतानगर येथील हणमंत शिवाप्पा लोणी यांचे चांगले मार्गदर्शन लाभले.
सदाशिवने घरी बसूनच ऑनलाईनच्या मदतीने अभ्यास केला आणि घवघवीत यश मिळवले. त्याच्या प्रयत्नाला आणि कष्टाला खऱ्या अर्थाने यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून व्यक्त होत आहे वैभव लोणी, राजू लोणी, डॉ. विनायक लोणी, सुरेखा लोणी यांनी उमदी येथे सत्कार केला. सदाशिवचे अभिनंदन जत तालुका बार असोसिएशनचे सचिव ॲड. सागर व्हनमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
IBPS ही स्वायत्त राष्ट्रीय संस्था आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे PBI (Public Sector Banks ) आणि RBI (Reserved Bank Of India) साठी भरती परीक्षा घेते. PBI मधील SBI बँक वगळता सर्व बँकांमधील कर्मचाऱ्याची भरती ही IBPS ने घेतलेल्या परीक्षेतून होते. IBPS परीक्षेतून बँकेतील सर्व श्रेणीतील अधिकारी यांची निवड करते.
इतर महत्वाच्या बातम्या :