सांगली : सांगलीतील (Sangli News) तासगाव तालुक्यातील बिरणवाडीत पाण्यासाठी रास्तारोको आंदोलन करणार्या शेतकर्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आक्रमक झालेल्या रोहित पाटील यांनी तासगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. रास्तारोको करणार्या आंदोलकांची तातडीने सुटका करावी, अशी त्यांनी मागणी केली. आंदोलकांना सोडले नाही, तर पोलिस ठाण्यातून न हटण्याचा निर्णय देखील रोहित पाटील यांनी घेतला. यावेळी रोहीत पाटील आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीचा देखील प्रकार घडला.
सिद्धेवाडी तलावात विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडावे, या मागणीसाठी शेतकर्यांनी आज रास्तारोको केला. त्यांना ताब्यात घेतल्यामुळे तासगावमधील आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
बिरणवाडी फाट्यावर तासभरापासून चक्का जाम
दरम्यान, विसापूर-पुनदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळजच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर रास्ता रोको केला. या चक्काजाममुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रास्ता रोकोच्या ठिकाणी येत नाहीत, तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.
पुनदी योजनेचे पाणी सावळजला सोडण्यात आले होते. मात्र, एका नेत्याच्या सांगण्यावरून अवघ्या काही तासात हे पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे सावळज भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत. पाण्याच्या बाबतीत राजकारण केले जात आहे. अधिकारी नेत्यांच्या सांगण्यावरून पाणी बंद करत आहेत. पाण्याच्या बाबतीत केले जाणारे राजकारण खपवून घेणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. बंद केलेले पाणी तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी सावळज शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्याजवळ सुमारे तासभर रास्ता रोको सुरू केला.
इतर महत्वाच्या बातम्या