Sangli News: न्याय हक्कासाठी मंत्रालयाकडे निघालेल्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग गावातील दलित समाजाबाबत जिल्हा प्रश्नासनाने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र लाँग मार्च आंदोलनात उतरेल, असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. बेडगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कमान ग्रामपंचायतीने पाडल्यानंतर गेल्या एक महिन्यांपासून संबंधितांवर कारवाई व्हावी आणि कमान पुन्हा उभी करावी या मागणीसाठी बेडगमधील दलित समाज आणि सांगली जिल्ह्यातील आंबेडकरप्रेमी आंदोलन करत आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने आणि गावात आंबेडकर यांच्या नावाला विरोध होत असेल, तर या गावात न राहण्याचा निर्णय घेत जवळपास दीडशेहून अधिक कुटुंबांनी घरदार सोडून न्याय हक्काच्या मागणीसाठी थेट मुंबईच्या मंत्रालयाकडे लाँग मार्च सुरू केला आहे. 


सुमारे 1 हजारहून दलित बांधव मिरज सांगलीमार्गे मुंबईकडे रवाना झाले आहेत. कसबे डिग्रज या ठिकाणी डॉ. भारत पाटणकर यांनी दलित समाजाची भेट घेतली, यावेळी त्यांच्याकडून झालेल्या प्रकारांबाबत माहिती जाणून घेत, कमानीबाबत ग्रामसभेमध्ये जर हा निर्णय झाला असेल तर त्याला कोणीच काय करू शकत नाही. त्यामुळे या प्रश्नावर मंत्रालयाकडे निघालेल्या दलित समाजाचे प्रश्न स्थानिक पातळीवरच जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवायला हवे होते आणि आमची मागणी आहे  याबाबत लवकर निर्णय व्हायला हवा, अन्यथा या लाँ मार्चमध्ये महाराष्ट्रातील पुरोगामी जनता उतरेल आणि हा एक व्यापक मार्च होईल,असा इशारा डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिला आहे.


बेडगच्या सरपंच, ग्रामसेवकास झेडपीकडून नोटीस


दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान अतिक्रमण समजून ग्रामपंचायतीने केलेली कारवाई सदोष असल्याचे चौकशीमध्ये आढळून आले आहे. याप्रकरणी सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकास ग्रामपंचायत अधिनियमानुसार नोटीस बजावण्यात आली आहे.  नोटिशीवर सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी करण्यात निखिल ओसवाल यांनी आज दिले आहेत. खुलासा समर्पक न वाटल्यास ग्रापं अधिनियम कलम 39 (1) अन्वये सभागृह अपात्रतेची कार्यवाही प्रस्तावित केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. 


आंबेडकरी समाजाकडून सुरेखा कल्लाप्पा कांबळे आणि इतरांनी बेडग येथील डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर कमान पाडल्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या प्रकरणी चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांची नियुक्ती केली होती. डॉ. लोखंडे यांनी मिरजेचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्यासोबत बेडग येथे समक्ष जाऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.


इतर महत्वाच्या बातम्या