सांगली : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (MLA Anil Babar) यांचे आज (31 जानेवारी) निधन झाले. न्यूमोनिया संसर्ग झाल्यानंतर आमदार अनिल बाबर यांना काल (30 जानेवारी) सांगलीमधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. 


कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच ते आमदार असा प्रवास


अनिल बाबर यांनी घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच ते आमदार असा मोठा राजकीय प्रवास केला. ते पहिल्यांदा 1972 मध्ये सांगली जिल्हा  परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले. त्यांनी विविध समित्यांचे सभापतीपद सुद्धा भुषवले. 1990 त्यांनी अपक्ष म्हणून आमदार निवडणूक लढवली. 1999 मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले. स्वर्गीय आर. आर. आबा यांच्याशी सुद्धा त्यांचे घनिष्ठ संबंध होते. सांगली जिल्ह्यात महत्वपूर्ण असलेल्या टेंभू योजनेचे जनक म्हणून ओळख ओळखले जाते. आमदार बाबर सलग 20 वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. मागील दोन निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांची जवळीक होती. ऐनवेळी फडणवीस यांच्या आग्रहामुळे गोपीचंद पडळकर यांनी 2019 ला पाठिंबा दिल्याने निवडणुकीत यश मिळाले होते. 


अनिल बाबर यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी , शिवसेना असा राजकीय प्रवास राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख होती. विटा आणि खानापूर मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने कोट्यवधींची विकासकामे मंजूर केली होती. सेना आमदारांची कामे होत नाही, म्हणून झालेल्या तक्रारींची चौकशी अहवाल तयार करा म्हणून मुख्यमंत्र्यांनी बाबर यांना दिली होती. मंत्रिपदासाठी नव्हे, टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी शिंदेंसोबत जात असल्याचेही आमदार अनिल बाबर यांनी म्हटले होते. 


दीड वर्षापूर्वी पत्नीचे निधन 


दरम्यान, अवघ्या दीड वर्षांपूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे निधन झाले होते. बाबर यांच्यासह पत्नी शोभाताई बाबर असे दोघांचेही अवघ्या दीड वर्षात निधन झाल्याने बाबर कुटुंबीयावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर यांना न्यूमोनिया झाल्यानंतर सुरुवातीला विटा येथे खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यानंतर त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं आहेत.  


इतर महत्वाच्या बातम्या